पाचोरा पोलिसांची मोठी कामगिरी : चोरीच्या 15 दुचाकींसह चोरट्यांना अटक –

जळगाव : पाचोरा पोलिसांनी दोन दुचाकी चोरट्यांकडून तब्बल 15 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. याबाबतची माहिती सोमवार, 29 जुलै रोजी पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पाचोरा तालुक्याच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले होते. त्यानुसार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना पाचोरा शहरात दुचाकी चोर फिरत असल्याची माहिती दिली.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांच्यासह कर्मचार्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. संशयीत आरोपी विशाल पांडुरंग पाटील (26, रा. गजानन नगर, पाचोरा) आणि रवींद्र बाबुराव पाटील (29, रा.गोंडगाव, ता.भडगाव) या दोघांना चोरीची दुचाकी क्रमांक (एम.एच.19 डी.ई.1810) सह पाचोरा पोलीसांनी अटक केली.

15 दुचाकी जप्त
दोघा आरोपींवर प्रथमच गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या तिसर्‍या साथीदाराचा कसून शोध सुरू आहे. आरोपींकडून एकूण चोरीच्या 15 दुचाकी जप्त करण्यात आल्या.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल शिंपी, रणजीत पाटील, श्यामकांत पाटील, योगेश पाटील, विनोद बेलदार, सचिन पवार, हरीश अहिरे आणि सुनील पाटील आदींच्या पथकाने केली.