शेगाव-शिर्डी बस पलटी;16 प्रवासी जखमी ;

मलकापूर, खामगाव आगाराची शेगाव-शिर्डी एसटीबस अचानक उलटली. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तांदुळवाडी वळणानजक फौजी ढाब्यासमोर आज २९ जुलै रोजी सकाळी ९.१५ वाजे दरम्यान सदर घटना घडली. यामध्ये १६ प्रवासी जखमी झाले असून तिघांना डोक्याला अधिक मार लागला असल्याने बुलढाणा हलविण्यात आले.

चालकासह १६ प्रवासी जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव आगाराची शेगाव-शिर्डी बस क्रमांक एमएच-४० वाय- ५५७६ आज २९ जुलै रोजी सकाळी मलकापूर आगारातून एकूण ३५ प्रवासी घेऊन निघाली होती. धरणगाव येथून पुढे गेल्यानंतर थोड्या अंतरावर ९:१५ वाजता तांदुळवाडी वळणानजीक फौजी धाब्यासमोर अचानक एसटी बस थांबली व महामार्गावरील दुभाजकावर उलटली. हा अपघात अचानक घडल्याने बसमधील प्रवाशांना एकच धक्का बसला व त्यांनी आरडाओरड सुरू केली. एसटी बस रस्ता दुभाजकावर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सदर घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत उलटलेल्या बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले. या अपघातात जीवितहानी झाली नसून चालकासह १६ प्रवासी जखमी झाले.

सदर अपघातात बसमधील शरद बारसू झोपे (४२, तळणी), गोविंद भास्कर नारखेडे (५७, बोराखेडी), वर्षा माधव भारंबे (३५ नरवेल), माधव नारायण भारंबे (४४ नरवेल), मंदा पंजाबराव देशमुख (६३), वैष्णवी पंजाबराव देशमुख (२३ वसाडी नांदुरा), रचना प्रभाकर वले (३८ कुर्हा), शोभा परमेश्वर पांडे (४० पैसोडा), गणेश ज्ञानदेव चेंडाळणे (३९) मानकी व चालक खुशाल हनुमंतराव देशमुख (३५) यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गोविंद भास्कर नारखेडे, माधव नारायण भारंबे व मंदा पंजाबराव देशमुख यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांना बुलढाणा येथे हलविण्यात आले.

याखेरीज उर्वरित जखमी प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिस, दसरखेड एमआयडीसी पोलिस व राज्य परिवहन महामंडळाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर पोलिसांनी काही काळ ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली.