भरधाव कारने दिलेल्या धडकेत पॅजो रिक्षाला जबर धडक ; तरुण ठार : जामनेर तालुक्यातील घटना :

जामनेर : भरधाव वेगाने येत असलेल्या येणाऱ्या चारचाकी वाहनाने पॅजो प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षामधील एकजण जागीच ठार झाला असून, ५ प्रवासी जखमी झाले आहेत. मृत व जखमी टाकळी खुर्द येथील रहिवासी आहे. सदरचा अपघात जामनेर- टाकळी दरम्यान दि. १९ मार्चला मध्यरात्री एकच्या सुमारास घडला. याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र आनंदा बावस्कर (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. टाकळी खुर्द येथील रवींद्र हा गाडेगाव येथील कंपनीत कामाला होता. १९ मार्चला रात्रीची शिफ्ट आटोपून रिक्षाने गावाकडे घरी निघाला होता. या दरम्यान समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामुळे रिक्षा दूरवर फेकली गेली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य प्रवाशी जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना ग्रामस्थांनी तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सुनील मुरलीधर सातव, रिक्षा चालक रामेश्वर बाजीराव मोरे, अनिल मुरलीधर सातव, अजय किरण चौरे व जीवन विकास अहिरे अशी जखमींची नावे आहे. राजू देवचंद बावस्कर (रा. टाकळी खुर्द, ता. जामनेर) यांचे फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.