मूल्यमापनात शैक्षणिक धोरणासह अध्ययन निष्पत्ती व तंत्रज्ञानाचाही विचार :पुण्यात पार पडला दोनदिवशीय राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्ग :

भुसावळ – सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करताना वापरण्यात येणाऱ्या विविध साधनतंत्रांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह अध्ययन निष्पत्ती व तंत्रज्ञानाचाही विचार व्हावा आणि त्यादृष्टीने अध्ययन-अध्यापन व मूल्यमापनात बदल करण्यात यावा. यासंदर्भात राज्यभरातील शाळांमध्ये करण्यात येणारे मूल्यमापन एकजिनसी व्हावे या हेतूने पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र येथे राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्ग पार पडला.

विद्यार्थ्यांच्या संपादणुक पातळीचा स्तर उंचावण्यासाठी दोनदिवशीय प्रशिक्षण वर्गात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण, नियतकालिक मूल्यमापन चाचण्या, कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन, आकारिक मूल्यमापन, मूल्यमापनासाठी तंत्रज्ञानाचा एकात्मिक वापर, मूल्यमापनाचे प्रकार व साधने तंत्रे, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन, अध्ययन निष्पत्ती आधारित अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन, मूल्यमापनाचे अभिलेखे, गुणवत्तापूर्ण मूल्यमापनाचे प्रश्न विकसित करणे, समग्र प्रगती पत्रक, इयत्ता पाचवी व आठवीच्या परीक्षा आदी विषयांवर एससीईआरटीच्या भाषा व समन्वय विभाग उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, उपविभागप्रमुुख वर्षाराणी भोपळे, संशोधन विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय थिटे, वरिष्ठ अधिव्याख्याता महादेव वांडरे, डॉ. गीतांजली बोरूडे, अधिव्याख्याता डॉ. शशिकांत शिंदे, चंदन कुलकर्णी, विषय सहाय्यक डॉ. जितेंद्र काठोळे, प्रदीप देवरे, कानिफनाथ साठे, डॉ. बाबासाहेब पवार, उमेशचंद्र खेडकर आदींनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गात राज्यभरातील तज्ज्ञ शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. राज्यस्तरीय प्रशिक्षणानंतर हे तज्ज्ञ शिक्षक विभाग व तालुक्यावर मार्गदर्शन करून शिक्षकांपर्यंत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात झालेले बदल पोहोचविणार आहेत.