आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून ४ जुलै रोजी रावेर येथे विशेष दिव्यांग तपासणी व UDID प्रमाणपत्र शिबिराचे आयॊजन

रावेर/भुसावळ (प्रतिनिधी)-:

रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि त्यांना UDID (Unique Disability ID) दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जळगावपर्यंत जावे लागू नये, यासाठी आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव यांच्या सहकार्याने शनिवार, दि. ४ जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, रावेर येथे विशेष दिव्यांग तपासणी व UDID दिव्यांग प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

४ जुलै रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत हे शिबिर ग्रामीण रुग्णालय, रावेर येथे आयोजित करण्यात येणार आहे. शिबिरात अस्थिरोग, नेत्ररोग, नाक-कान-घसा, बालरोग, मानसोपचार, त्वचारोग तसेच मेडिसीन विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून UDID प्रमाणपत्रासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

रावेर व यावल तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांकडे अद्याप UDID (Unique Disability ID) दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध नाही, त्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी अर्ज केलेला असूनही प्रमाणपत्र मिळाले नसलेल्या लाभार्थ्यांनीही शिबिरात उपस्थित राहावे.

सदर शिबिरासाठी लाभार्थ्यांनी आधार कार्ड (मूळ व छायाप्रत), दिव्यांग व्यक्तीचा पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, UDID कार्डसाठी भरलेला ऑनलाइन अर्ज (ऑनलाइन नोंदणी अनिवार्य), तसेच पूर्वीचे वैद्यकीय अहवाल, एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन किंवा इतर संबंधित वैद्यकीय कागदपत्रे (असल्यास) सोबत आणावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

UDID प्रमाणपत्राच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध शासकीय योजना, शैक्षणिक सवलती, प्रवास सवलत, पेन्शन, शिष्यवृत्ती तसेच इतर शासकीय लाभ मिळविणे अधिक सुलभ होते. त्यामुळे पात्र दिव्यांगांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपले UDID प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी केले आहे.

या शिबिरामुळे रावेर व यावल तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना जिल्हा मुख्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. स्थानिक पातळीवरच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने हा उपक्रम दिव्यांगांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.