नाशिक – येथील भद्रकाली परिसरातील भद्रकाली देवीही सर्व देवींइतकीच महत्त्वाची आहे. भगवान विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शनचक्राने सतीच्या शरीराचे अनेक भाग केले. त्यावेळी जिथे जिथे देवीच्या शरीराचे तुकडे पडले तिथे एक शक्तिपीठ तयार झाले. अशा प्रकारे भारतात देवीची ५१ शक्तिपीठे तयार झाली. त्यापैकी नाशिकचे भद्रकाली हे एक पीठ तयार झाले. सतीच्या हनुवटीचा भाग येथे पडला. संस्कृत भाषेत हनुवटीला ‘चिबुक’ म्हणतात. यावरून पौराणिक काळात नाशिकला ‘चिबुकस्थान’ असेही म्हणत असत.
पूर्वी भद्रकालीचे मंदिर बुधवार पेठेत होते. मात्र, कालांतराने मूर्ती भंजकांच्या भीतीने मंदिरातील मूर्ती सुरक्षितरीत्या सध्याच्या ठिकाणी हलविण्यात आली. तेव्हापासून या मूर्ती आताच्या मंदिरात ठेवण्यात आल्या आहेत. भद्रकाली मंदिराच्या जागी पूर्वी मठ होता. त्यामुळे या मंदिराला कळस नाही. आजही भद्रकालीचे मंदिर एखाद्या टोलेजंग वाड्यासारखे दिसते. १७९० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असे सांगितले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे चिमाजी पटवर्धन यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची नोंद आढळते.
भद्रकाली देवीच्या गाभाऱ्यात ९ ते १० इंच उंचीच्या ९ मूर्ती आहेत. या मूर्ती पंचधातूंच्या असून, या नवदुर्गा आहेत. या मूर्तींबरोबरच एक दशभुजांचा गणपतीदेखील येथे आहे. या सगळ्या मूर्ती अतिशय प्राचीन असून, आजही त्यांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते. मंदिरात शारदीय व चैत्र नवरात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात येथे खूप गर्दी होते.



