भुसावळ ( प्रतिनिधी )- राज्यात सुरू होत असलेल्या विशेष गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची अंमलबजावणी पारदर्शक, प्रभावी व त्रुटीरहित पद्धतीने व्हावी, यासाठी राज्यातील सर्व बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) यांना एक महिन्याची विशेष रजा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागातर्फे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत शुक्रवार ३ जुलै रोजी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्यभर २९ जूनपासून SIR प्रक्रिया सुरू होत असून, ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा व राज्यातील सर्व BLO कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित कामकाजातून एक महिन्यासाठी मुक्त करून केवळ SIR प्रक्रियेच्या कामासाठी नियुक्त करण्यात यावे. त्यामुळे मतदार नोंदणी व पडताळणीचे काम अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होईल. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने निवेदनात नमूद केले आहे की, यापूर्वी पश्चिम बंगाल व बिहारमधील निवडणुकांदरम्यान राबविण्यात आलेल्या SIR मोहिमेबाबत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामध्ये अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मोठ्या संख्येने नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहिल्याची बाब समोर आली होती. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी निवडणूक आयोग व राज्य शासनाने SIR प्रक्रिया अत्यंत काटेकोर व पारदर्शकपणे राबविणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या मागणीचे निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो. मुनव्वर खान, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्रसिंह पाटील, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, माजी जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी (जळगाव), माजी नगरसेवक अहमद कुरेशी तसेच इस्माईल गवळी उपस्थित होते.


