ध्येय उराशी बाळगून डॉ. जगदीश पाटील सर यांची स्थितप्रज्ञपणे सकारात्मक वाटचाल :

भुसावळ – वर्तमानकाळात प्रयत्नवादी असणारी माणसे आपल्या कर्माने भविष्यकाळ उज्ज्वल बनवितात, अशा माणसांना जीवनात अनेक वेळा संकटांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्या जीवनात आलेली ही संकटे त्यांना विचलित करण्यासाठी आलेली नसतात तर त्यांनी संकटांना हिंमतीने तोंड कसे द्यायचे हे शिकवण्यासाठी आलेली असतात. त्यातूनच अशी स्थितप्रज्ञ माणसे घडतात आणि तीच आदर्शाचा महामेरू ठरतात. आपण जीवनात अनेक व्यक्ती पाहतो की, त्या प्रचंड इच्छाशक्तीने स्वबळावर स्वतःसाठी काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने मार्ग आखत असतात आणि हे मार्ग बनवत असताना त्यांना अनेक अडचणी येतात. पण या अडचणींनाच आव्हान समजून अगदी आनंदाने स्वीकारतात, जणू काही त्या अडचणी त्यांना अधिक प्रबळ बनविण्यासाठी आणि त्यांना मार्गक्रमण करताना संयमाने पुढे चालत राहावे, यासाठी दिशादर्शक ते मानतात. अडचणी आणि प्रबळ इच्छा या दोघांना ती व्यक्ती बुद्धीच्या जोरावर समांतर करत असते आणि ही समांतरता ज्याला जमते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. अशी समांतरता आपल्या उच्च कोटीच्या बुद्धिमत्तेतून पेलवणारे भुसावळ येथील रहिवासी तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील सर यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. नुकताच त्यांना आपल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित समारंभात गौरविण्यात आले.

कौटुंबिक, सामाजिक, नैतिक गुणांचा परिपाक असलेले आदर्श व्यक्तिमत्त्व डॉ. जगदीश पाटील यांनी वयाच्या तिशीतच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मराठी विषयात संत एकनाथांची अभंगगाथा : भक्ती विचार या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली. तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे तथा बालभारती येथे मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य म्हणून त्यांनी काम केले असून आठवी, दहावी व बारावीच्या सात पाठ्यपुस्तक निर्मितीत अभ्यास गट सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार सर्व शाळांचे मूल्यमापन करण्यासाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आराखडा SQAAF निर्मितीमध्ये ते राज्यस्तरावर कार्य करत आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी शिकायचे कसे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण म्हणून अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षण कार्यक्रमात राज्यस्तरीय सुलभक म्हणून कार्य करत आहे. कष्ट करण्याची जिद्द आणि आपल्या कामाप्रती विश्वास असेल तर नक्कीच जीवनात यश मिळते आणि हेच यश त्यांना प्रत्येक पावलोपावली मिळत गेले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
विद्वत्त्वं च न्रुपत्वम च नैव तुल्य कदाचन
स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते
राजा आणि विद्वान यांच्यामध्ये राजाला फक्त आपल्या राज्यात आदर मिळतो पण विद्वान हा सर्वत्र आदरास पात्र ठरतो आणि असे मौलिक कार्य करून राष्ट्रहितासाठी जीवन जगणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला विविध सामाजिक संस्था, जिल्हास्तर तसेच राज्यस्तरावर विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे. त्यामुळे पुरस्कारास पात्र असे ते अनोख कार्यप्रवण व्यक्तिमत्व आहे.

शिक्षणक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२२-२३ हा पुरस्कार मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे समारंभात प्रदान करण्यात आला. त्यानंतर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात डॉ. जगदीश पाटील सर गुणगौरव समिती भुसावळ यांच्यातर्फे भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करून त्यांना सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आजपर्यंत सातत्याने करत आलेल्या सामाजिक, शैक्षणिक योगदानाचे वास्तव रूप म्हणजे त्यांना देण्यात आलेले हे अनेकविध पुरस्कार होय. उच्च कोटीची सामाजिकता असलेली व्यक्ती आपल्या अंगी असलेले गुण आणि ज्ञान यांचा संगम करून समाजात सुविचारांचे बीज रोवत असतात. अशा व्यक्तींबद्दल म्हणायचे झाले तर,
समाजातील विविध स्तरावर,
अमौलिक करतात गुंतवणूक,
नव्या विचारधारा नवे प्रवाह,
नव्या संकल्पांची रुजवणूक.
आणि हीच रुजवणूक त्यांच्या बहरलेल्या कार्यातून आपण पाहत असतो. असे कार्य करीत असताना
कुणी अशा कार्याची प्रशंसा करो किंवा न करो ही उत्तमाचा वेध घेणारी पाऊले सतत प्रयत्नशील असतात हेच खरे.
ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करणं,
हे त्यांच्याकडून शिकावं,
काय मिळवलं याहून किती मिळवलं,
याचं मोजमाप अधिक असावं.
सागरातील लाट प्रवाही असते. कधी हलकेच प्रवाहात झेप घेते तर कधी गटांगळ्या खात रौद्ररूप धारण करते आणि अशाच लाटांचा प्रत्यय जीवनात येतो आणि तो येणे गरजेचे आहे. कारण आपण किती सकारात्मक पाऊल टाकतो, हे त्यावरून ठरत असते. अशीच ध्येय उराशी बाळगून अनेक लाटांसोबत मजल दरमजल करत सकारात्मक वाटचाल करणाऱ्या डॉ. जगदीश पाटील सर यांना वाढदिवसाचे अभीष्टचिंतन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. परमपिता परमेश्वर आपल्या ज्ञानरूपी तेजाचे किरण आपल्यावर सदा प्रकाशित करत राहो व ईश्वरी प्राप्त आपल्या ज्ञानाने इतर शैक्षणिक समाज प्रज्वलित होत राहो. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा परमशांतीने, चिरकाल टिकणाऱ्या आनंदाने आणि दैवीशक्ती प्राप्त उत्तम आरोग्याने सदैव भरलेला राहो. आपली प्रत्येक मनोकामना परमपिता परमेश्वर यथावकाश पूर्ण करो व आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो. आपली किर्ती दशदिशांपर्यंत पोहोचो. आपले बौद्धिक स्वामित्व चिरकाल प्रस्थापित राहो, हीच ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने परमपित्या परमेश्वराला प्रार्थना.

  • श्री प्रमोद आठवले सर
    (उपमुख्याध्यापक, श्री संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भुसावळ)
    9420941213