भुसावळ/ प्रतिनिधी

सध्याचा कालखंड हा खूप धकाधकीचा आहे. मनुष्य धनाने श्रीमंत असला तरी मनाने मात्र खचला आहे. अशावेळी अध्यात्म हे सर्व मनुष्य जातीला तारक असून सुख आणि समाधान साठी संतांना शरण जावे. संतांच्या शरणांगतीतून मनुष्याला समाधान प्राप्त होते. परब्रम्ह योगी या अध्यात्मिक काव्यचिंतनात प्रत्येक शब्द हा ईश्वरीयतत्त्वाला स्पर्श करणारा असून यातून वाचकांना परमानंद प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक आणि विचारवंत ह.भ.प.प्रा.रामकृष्णादादा महाराज पाटील यांनी केले
ज्ञानेश्वर घुले लिखित ‘’परब्रम्ह योगी’’ काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. लोणारी मंगल कार्यालयात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष श्री.युवराज लोणारी, गजानन महाराज भक्त मामा पाचपांडे, गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रकाश विसपुते, अंतर्नादचे सदस्य अमितकुमार पाटील उपस्थित होते. सूत्रसंचलन जीवन महाजन यांनी तर आभार चंद्रशेखर घुले यांनी मानले. दीपाली कांदेले, विकास महाजन यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना ज्ञानेश्वर घुले असे म्हणाले की, आई-वडीलांच्या पुण्याइने मला बालवयात धार्मिक संस्कार मिळाले, त्याचीच परिणती म्हणून मी श्री गजानन महाराज यांच्या बद्दल परब्रह्म योगी हा काव्य संग्रह लिहू शकलो आणि धाडस करू शकलो. मी माझ्या जवळील शब्दांवर फुंकर घालून बोलते केले आहे.जे हृदयात आहे तेच शब्दांत प्रवाही झाले आहेत. स्वामींचे गुणगाण करतांना कधी जवळीक साधली तर कधी प्रश्नही विचारले आहेत. या स्तुती कवन रचना आपणास आवडतील असे गृहीत धरतो.
सदर कार्यक्रमात नर्मदा परिभ्रमण करणारे डॉ.नि.तू.पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थिताना परब्रम्ह योगी काव्यसंग्रह भेट देण्यात आला. या वेळी कोचूरचे माजी सरपंच राजेंद पाटील, डॉ. शरद झोपे, महेंद्र पाटील उपस्थित होते.अंतर्नाद प्रतिष्ठानचे सदस्य योगेश इंगळे, प्रदिप सोनवणे, प्रसन्ना बोरोले, शैलेंद्र महाजन, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, अमित चौधरी, तेजेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, भूषण झोपे, समाधान जाधव, ललित महाजन, राजू वारके, संदीप पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.


