भुसावळ रेल्वे यार्डात कंटेनरचे सात डबे रूळावरून घसरले :

भुसावळ : भुसावळ रेल्वेे यार्डातून मुंबई येथे पोर्ट टर्मिनल्स (जेएनपीटी) येथे कंटेनर वाहून नेत असलेल्या मालगाडीचे सात कंटेनर रूळाखाली घसरले. ही घटना शुक्रवार, 9 जून रोजी 8.30 वाजता घडली तर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हे कंटेनर पूर्ववत रेल्वे रूळावर आणण्यात यंत्रणेला यश आल्याची माहिती जनसंपर्क अधिकार्‍यांनी दिली.
नागपूरहून जेएनपीटी बंदरावर कंटेनरगाडी निघाल्यानंतर भुसावळ यार्डात आली व शुक्रवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कंटेनर गाडी यार्डातून बाहेर पडून मुंबई येथे पोर्ट टर्मिनल्सकडे निघाली असताना इंजिनापासून काही अंतरावरील सात डबे रूळावरून खाली घसरले. रेल्वे यार्डात अपघात झाल्याची धोक्याची सूचना देणारे सायरन वाजवण्यात आल्यानंतर अधिकार्‍यांनी धाव घेतली.
अपघातग्रस्त डब्यांच्या मागील डबे बाजूला काढून घेत फक्त रूळावरून उतरलेले डबे तेथे ठेवत कामाला सुरूवात करण्यात आली.
डीआरएम एसएस केडीया यांच्यासह एडीआरएम व अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देत कामाच्या दृष्टीने सूचना केल्यात. अपघात झाल्यामुळे रेल्वे रूळ खराब झाल्याने ते रूळ व त्याखालील सिमेंटचे तुटलेले स्लिपर बदलण्याचे काम शंभराहून अधिक कर्मचार्‍यांनी शनिवारी पहाटेपर्यंत करीत 18 तासात मार्ग खुला केला. दरम्यान, रेल्वे यार्डात झालेल्या अपघाताची वरीष्ठ अधिकार्‍यांकडून चौकशी होणार आहे, तश्या सूचना डीआरएम केडीया यांनी दिल्या आहेत.