भुसावळ – पुस्तकांमध्ये उत्कृष्ट लेखकांचे अनुभव आणि विचार असतात. पुस्तके वाचल्याने आपले व्यक्तिमत्त्व विकसित होते. वाचनामुळे भाषेची कौशल्ये आणि शब्दसंग्रह विकसित होते. पुस्तके वाचणे हा तणाव कमी करण्याचा देखील एक मार्ग आहे. पुस्तके वाचल्याने आपल्या मनाला बौद्धिक आहार मिळतो. वाचनामुळे आपली मानसिक कार्यक्षमता वाढते. त्यामुळे पुस्तकांचे वाचन खरोखरच आनंदाचे स्रोत असल्याचे प्रतिपादन बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी येथे केले.

भुसावळ येथील सार्वजनिक वाचनालयात पुस्तक दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रंथपाल नितीन तोडकर, सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे, सेवक होनाजी चौधरी, अजय पाटील, श्री. अत्तरदे यांच्यासह वाचकांची उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वती मातेच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात ग्रंथपाल नितीन तोडकर म्हणाले की, सार्वजनिक वाचनालयाने गेल्या 153 वर्षात भुसावळसह परिसरातील वाचकांना ज्ञानाचे एक दालन उपलब्ध करून दिले आहे. तंत्रज्ञानाच्या युगात वाचन कमी होत असले तरी सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी नवनवीन उपक्रम घेतले जात असतात. या उपक्रमांना वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचेही श्री. तोडकर यांनी सांगितले. सहाय्यक ग्रंथपाल अवधूत दामोदरे म्हणाले की, पुस्तकदिनाचे औचित्य साधून व सार्वजनिक वाचनालयाला 153 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल वाचनालयातील विविध विषयांवर आधारित असलेल्या 153 पुस्तकांचे तीन दिवस प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सर्व वयोगटातील लोकांना पुस्तके आनंद प्रदान करतात. त्यामुळे सार्वजनिक वाचनालयात मुलांसाठी, वृद्धांसाठी, स्त्रीयांसाठी, सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पुस्तके आहेत. त्यामुळे वाचकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. दामोदरे यांनी केले. उद्घाटनपर मनोगतात डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, आपण जेव्हा वाचनाची सवय विकसित करताे, तेव्हा अखेरीस आपल्याला त्याची सवय होते. वाचन आपल्याला जीवनाबद्दल नवीन दृष्टीकोन प्रदान करण्यास मदत करते. चांगली पुस्तके आपल्यावर सकारात्मक प्रभाव टाकत असतात आणि आयुष्यात योग्य दिशेने नेतात, असेही ते म्हणाले.


