वरणगावात दुषित व दुर्गधीयुक्त पाणीपुरवठा –

भुसावळ – वरणगाव शहरात अवेळी, दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पालिकेचा निष्काळजीपणा समोर आला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शहरातील महिलांनी आज २३ मे रोजी पालिकेत धडक देऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.

शहरात ठिकठिकाणी जलवाहिनीला गळत्या लागल्या आहेत. या गळत्या लागलेल्या ठिकाणी जलवाहिनी जवळील खड्ड्यांमध्ये पाण्याची गळती होते. त्याच साचलेल्या दूषित पाण्याचा निचरा जलवाहिमध्ये होतो. आणि तोच पाणीपुरवठा नागरीकांना केला जातो. त्यामुळे नळाला दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही पालिकेने कोणतीही उपाययोजना केली नाही.

नागरिकांमध्ये तीव्र संताप

वरणगावमध्ये महिन्यातून दोन दिवस पाणीपुरवठा होतो. त्यातही गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होतो. या पाण्याला उग्रवास येतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. यातून आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. पालिकेचे मुख्याधिकारी पाणीपुरवठा व आरोग्य अधिकारीही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वरिष्ठांनीच या समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दुषित पाणी पुरवठ्या संदर्भात पाणीपुरवठा विभागाकडून माहिती घेऊन लवकरच उपाययोजना केल्या जातील. नियमित व शुध्द पाणी पुरवठा करण्याविषयी नियोजन सुरू आहे. तरी नागरीकांनी पाणी भरणे झाल्यावर नळाला तोट्या लावाव्या जेणेकरून पाण्याची नासाडी न होता, इतरांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळू शकेल. … समीर शेख, मुख्याधिकारी, वरणगाव नगरपरिषद.