भुसावळ, दि. 4 जुलै 2026 (प्रतिनिधी)- हतनूर प्रमुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे 32 रेडियल गेट प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात आले असून, त्याद्वारे 2,013 घनमीटर प्रति सेकंद (71,089 क्युसेक) वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. या मोठ्या विसर्गामुळे तापी नदी दुथडी भरून वाहू लागली असून, नदीपात्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, नदीपात्रात किंवा नदीकिनारी जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या हतनूर धरणाची पाणीपातळी 212.090 मीटर असून, धरणाची पूर्ण जलसाठा पातळी 214.000 मीटर आहे. धरणातील एकूण जलसाठा 284.60 दशलक्ष घनमीटर (73.35 टक्के) इतका नोंदविण्यात आला आहे, तर उपयुक्त जलसाठा 151.60 दशलक्ष घनमीटर (59.45 टक्के) इतका आहे. दरम्यान, कालव्यातून 8.50 घनमीटर प्रति सेकंद (300 क्युसेक) पाण्याचा विसर्ग सुरू असून, आर.एस. गेटद्वारे सध्या कोणताही विसर्ग करण्यात आलेला नाही. हतनूर प्रकल्प परिसरात आज 28 मिमी पावसाची नोंद झाली असून, एकूण पर्जन्यमान 76 मिमीपर्यंत पोहोचले आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


