वर्धा : भरधाव चारचाकी पुलावरून कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात सात मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे हा अपघात घडला. अपघातात चारचाकी वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला. मयत विद्यार्थी हे 25 ते 35 वयोगटातील असून मित्राच्या बर्थडे पार्टीवरून परतताना हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

यांचा अपघातात झाला मृत्यू
मृतांमध्ये तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आमदार रहांगडाले यांचा पूत्र अविष्कार रहांगडाले याच्यासह निरज चव्हाण (22, गोरखपूर, अविष्कार विजय रहागडाले (21, गोंदिया), नितेशसिंग (25, राज्य ओडीसा), विवेक नंदन (23, गया, बिहार) आणि प्रत्युशसिंग हरेन्द्रसिंग (23, गोरखपुर), शुभम जयस्वाल (23, रा.दिनदयाल उपाध्याथ नगर, युपी) , पवनशक्ती (19, रा.गया बिहार अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
मृतांमध्ये आमदार पूत्राचा समावेश
भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ते नदीच्या पुलावरून खाली पडलं. पडल्याने सातही विद्यार्थी जागीच ठार झाले. मृतांमध्ये भंडारा जिल्ह्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा असल्याची माहिती आहे. गंभीर म्हणजे मृतांमध्ये सर्वच जवळपास 25 ते 35 वयोगटातील आहेत. मंगळवारी रात्री एक वाजताच्या जवळपास हा अपघात झाला. पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
पोलिस अधिकार्यांची घटनास्थळी धाव
अपघातानंतर वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप सावंगी पोलिस निरीक्षकांनी धाव घेतली. सर्व मृतक हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. मृतदेह वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत तर या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


