जळगावात महिलेची हत्या करून मृतदेह नदीपात्रात पुरला : दोघांना अटक –


जळगाव : शहरातील शिवाजी नगरातील बेपत्ता झालेल्या ५१ वर्षीय विवाहितेची हत्या झाल्याचा प्रकार उघड झाला असून जळगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. विवाहितेची तापी नदी पात्रात हत्या करून बुजविण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. माया दिलीप फरसे (51, रा. क्रांती चौक, शिवाजी नगर जळगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

घातपाताचा आधीपासून होता संशय
माया दिलीप फरसे (51) ह्या बुधवार, १५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. महिलेचा घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. या संदर्भात नातेवाईकांनी अमोल रतनसिंग दांडगे (२७) आणि संतोष रामकृष्ण मुळीक (२२, रा. शिवाजी नगर, जळगाव) या दोघांवर संशय व्यक्त केल्याने सोमवारी शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गभाळे, उपनिरीक्षक अरुण सोनार, कर्मचारी भास्कर ठाकरे, रतन गिते यांनी दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याच्या बोलावण्यात आले व नंतर तिची हत्या झाली असावी ? अशी देखील चर्चा आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दाखल होवून पुरलेला मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे.