भुसावळात वीज कंपनी अधिकारी धारेवर : तुम्ही जनतेचे नोकर, जनतेच्या पैशातून तुमचा पगार – आमदार सावकारे : वीज महावितरण कंपनीच्या कारभाराविरोधात आमदार संजय सावकारेंचा संताप :


भुसावळ : वीज महावितरण कंपनीतर्फे शेतकर्‍यांना अवाजवी वीज बिले दिली जात असून दोन-दोन महिने वीज डीपींची दुरुस्ती केली जात नसताना शिवाय वीज रीडींगनुसार बिले न देता सरासरी बिले पाठवून बिले न भरणार्‍या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा वीज कंपनीने लावल्याच्या तक्रारी आल्यानंतर वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना आमदार संजय सावकारे यांनी सोमवारी चांगलेच धारेवर धरले. तुम्ही जनतेचे नोकर आहात, जनता भरत असलेल्या पैशातून (वीज बिलातून) तुमचा पगार होत असल्याचे खडेबोल आमदारांनी यावेळी सुनावल्याने अधिकार्‍यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाचा सामना करीत असताना वीज कंपनी आडमुळे धोरण स्वीकारत असल्याने यावेळी शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

शेतकर्‍यांनी वाचला समस्यांचा पाढा
साकेगावसह परीसरातील शेतकर्‍यांच्या शेतातील वीज कनेक्शन कट करण्याचा महावितरणने सपाटा लावल्यानंतर त्रस्त शेतकर्‍यांनी आमदारांकडे कैफियत मांडली तर चोरवड सबस्टेशनकडे निघालेले शेतकरी सोमवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावरील भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे यांच्या पंपावर जमल्यानंतर येथेच वीज कंपनीच्या अधिकार्‍यांना बोलावण्यात आल्यानंतर शेतकर्‍यांनी समस्यांचा पाढाच वाचून संताप व्यक्त करीत अधिकार्‍यांची बोलती बंद केली.

आमदार म्हणाले, रीडींगनुसार मिळावीत बिले
दोन-दोन महिने तक्रारी करूनही वीज डीपींची दुरुस्ती केली जात नाही, मीटर रीडींगनुसार वीज बिले न आकारता मोठ्या रकमेची वीज बिले आकारून शेतकर्‍यांचा वीज पुरवठा खंडित केला जात असल्याची बाब चुकीची आहे. आधीची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त आहेत त्यातच महावितरण कंपनीतर्फे चुकीच्या पद्धत्तीने कारवाई केली जात असल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे आमदार म्हणाले. नैसर्गिक कारणांनी किंवा चोर्यांमुळे बंद पडलेल्या डीपी तत्काळ दुरुस्त करावी, नादुरुस्त मीटर बदलून सरासरी बिले न देता रीडिंग नुसारच वीज बिले द्यावेत, अशा सूचना आमदार सावकारे यांनी यावेळी केल्या. वरीष्ठांशी बोलून लवकरात-लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकार्यांनी दिले. वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता पी.आर.घोरूडे, धांडे, भंगाळे आदींची उपस्थिती होती.

यांची बैठकीला उपस्थिती
प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र पुंडलिक चौधरी, साकेगावचे माजी सरपंच अनिल पाटील, किसान मोर्चाचे कैलास झोपे, संजय पाटील व महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने त्रस्त असलेले ग्रामीण भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

अन्याय सहन करणार नाही : आमदार
एकीकडे अतिवृष्टीमुळे महाविकास आघाडी सरकार कोणत्याही शेतकर्याचा वीजपुरवठा कट करणार नसल्याचा वल्गना करीत असताना दुसरीकडे त्यांच्याच महावितरण कंपनीकडून शेतकर्यांना अवाजवी व भरमसाठ बिले आकारून वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. अस्मानी संकटामुळे त्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांवर होत असलेला कोणताही अन्याय कदापी सहन करण्यात येणार नाही, असे आमदार संजय सावकारे यावेळी म्हणाले.