साक्री : कीर्तन सुरू असताना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचे निधन झाले. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात जामदे येथे ही घटना सोमवार, 27 रोजी घडली.

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराज पारायण सप्ताह निमित्त सातव्या दिवशी सोमवारी जामदे येथे त्यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. ताजोद्दीन महाराजांना कीर्तन सुरू असतानाच हृदय विकाराचा झटका आला आणि ते अचानक खाली कोसळले. यानंतर स्थानिक मंडळी त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथे नेत असतानाच रस्त्यातच त्याचे निधन झाले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, ताजोद्दीन महाराज यांचे कार्य खूप मोठे होते. धार्मिक कट्टर पंथियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य अत्यंत निष्ठेने केले, अशी भावना वारकरी सेवा संघ, महाराष्ट्र यांनी व्यक्त केली आहे.
शेवट तो भला बहु गोड झाला
गेल्या दोन वर्षांपूर्वी साक्री तुलुक्यातील प्रतापूर येथे सप्ताहनिमित्त हरिभक्त परायण ताजोद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. तेव्हा ते म्हणाले होते, की मला कीर्तन करताना मरण आले, तर माझ्या सारखा भाग्यवान मीच असेल. तो योगायोग महाराजांच्या जीवनात घडून आला. साक्री तालुक्यातील जामदे, या गावात ज्ञानेश्वरी पारायणनिमित्ताने सुरू असलेल्या कीर्तनात महाराजांना हृदयविकाराचा झटका आला आणि नंदुरबार येथे उपचारासाठी घेऊन जात असताना महाराजांनी रस्त्यातच देह ठेवला. या दोन्ही घटनांचे साक्षीदार असलेल्या हभप संदीप महाराज वसमार यांनी सांगितले, की माझ्या डोळ्यासमोरच या दोन्ही घटना घडल्या. हा विलक्षण योगायोग महाराजांच्या जीवनात आला. शेवटी हेच म्हणावे लागेल, की ’शेवट तो भला बहू गोड झाला.’


