भुसावळ – ताप्ती एज्युकेशन संचलित भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नहाटा वाणिज्य महाविद्यालयात “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज दिनांक 01/08/2021 रोजी साजरी करण्यात आली. “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व 31 जुलै जागतिक वनसंरक्षण दिन असल्याने दोन्हींचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम ऑनलाइन मोडमध्ये घेण्यात आलेला असून कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी हे होते. तसेच कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एस.नाडेकर यांनी केले.

प्रास्ताविकातून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना उजाळा दिला गेला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे समाज जीवनातील चित्रण स्पष्ट करण्यात आले. लोकमान्य टिळकांच्या जहालवादी विचारांवर प्रकाश टाकण्यात आला. तसेच पर्यावरण संरक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या व्याख्यानातून प्राध्यापक डॉ. विलास महिरे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्व स्पष्ट केले. ओझोनच्या थराचे घटते प्रमाण व पर्यावरणावर होणारा परिणाम वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केला.
सध्याच्या जागतिक तापमान वाढीच्या समस्या पर्यावरणीय असंतुलनामुळे वाढलेल्या दिसतात हे विविध उदाहरणातून त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ.ए. डी.गोस्वामी यांनी दोन्ही महापुरुषांच्या विनम्र स्मृतींना अभिवादन केले. लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. पर्यावरण असंतुलनाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम स्पष्ट केले. राष्ट्रीय सेवा योजना समाजाच्या प्रबोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका घेत असल्याचे प्रतिपादन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने एक एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा लक्षात ठेवण्यास सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कुमारी जयश्री पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी महिला कार्यक्रमाधिकारी डॉ.ममताबेन पाटील मॅडम, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रथम व द्वितीय वर्षाचे स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा. डॉ.एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य डॉ. एन. इ. भंगाळे व उपप्राचार्य डॉ. ए. डी.गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.


