भुसावळ तालुक्यासाठी 77 हजार पाठ्यपुस्तके दाखल :

भुसावळ – भुसावळ तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शासनाकडून 77 हजार 536 पाठयपुस्तके प्राप्त झाली आहेत. लवकरच तालुक्यातील शाळांना त्याचे वितरण होईल तर यानंतर शाळा स्तरावरुन विद्यार्थ्यांना हे पाठ्यपुस्तके वितरीत केली जाणार आहे.
शहरासह तालुक्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी शासनाकडून पुस्तके प्राप्त झाली असून ती जामनेररोडवरील पालिकेच्या म्युनिसीपल हायस्कूलमध्ये ठेवण्यात आली आहे.

गटशिक्षण अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सोमवारपासून या पुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. इंग्रजी माध्यमाचे इयत्ता तिसरी ते आठवीपर्यंतची पुस्तके आहेत. यात काही विषयांची पुस्तके अद्याप मिळाली नाहीत. ती यानंतरच्या टप्प्यात उपलब्धतेनुसार दिली जाणार आहेत. तर मराठी माध्यमाच्या इयत्ता दुसरी ते आठवी पर्यंतची पुस्तकेही प्राप्त झाली आहेत. यातील इयत्ता चौथी, सहावी व सातवीची काही विषयांची पुस्तकेही मिळणार आहे. इयत्ता पहिली व दुसरीची पुस्तकेही लवकरच मिळतील. सोमवारी शाळांचे मुख्याध्यापक किंवा प्रतिनिधींना पुस्तकांचे वितरण होऊन यानंतर शाळा स्तरावरुन पालकांना हे पुस्तके दिली जाणार आहेत. यामुळे आगामी काळात शाळा पून्हा सुरु झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत होणार आहे.