भुसावळ – संपूर्ण राज्यभरात सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांमध्ये शेकडो पीएच.डी. धारक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांनी अध्यापनाबरोबरच संशोधन केले असल्याने त्यांच्या गुणवत्तेचा उपयोग व्हावा या दृष्टिकोनातून त्यांची नियुक्ती शिक्षण विभागातील उच्चपदस्थ रिक्त जागांवर करण्यात यावी, अशी मागणी पीएच.डी. धारक शिक्षकांकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात नुकतीच मुंबई येथे शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
शालेय शिक्षणमंत्री ना. वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या चर्चेत आमदार डॉ. बालाजी किणीकर कल्याण, महेश मोरे ठाणे, ज्ञानेश्वर म्हात्रे कोकण यांच्यासह पीएच.डी. धारक शिक्षक डॉ. राजेश पावडे नांदेड, डॉ. जयश्री मोरे ठाणे, डॉ. जगदीश पाटील जळगाव आणि डॉ. बालाजी समुखराव लातूर यांच्या शिष्टमंडळाने सहभाग घेतला. राज्यातील विविध शाळांमध्ये कार्यरत पीएच.डी. धारक शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने मागवावी आणि धोरणात्मक व प्रशासकीय निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पीएच.डी. धारक शिक्षकांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाईल, असे आश्वासन यावेळी शिक्षणमंत्री ना. गायकवाड यांनी दिले. यावेळी शिष्टमंडळातर्फे त्यांना निवेदन सादर करण्यात आले.

उच्च विद्याविभूषित शिक्षकांचे गुणवत्तेत योगदान – शिक्षणमंत्री ना. गायकवाड यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्यात सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावीच्या शाळांमध्ये शेकडो शिक्षक पीएच.डी. धारक आहेत. अध्यापनासोबतच संशोधनाचे अंग असल्याने त्यांनी विविध विषयांमध्ये पीएच.डी. ही शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन केली आहे. त्यांच्याकडे अध्यापनाचा अनुभव, शिक्षणक्षेत्राचे सखोल ज्ञान, संशोधनात्मक व गुणवत्तापूर्ण अनुभव आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्राशी निगडीत शासन-प्रशासन, अधिकारी, शिक्षक, समाज, पालक व विद्यार्थी या सर्वच घटकांचा ते सुयोग्य समन्वय साधून शैक्षणिक गुणवत्तापूर्ण विकास करतील. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग शैक्षणिक गुणवत्ता वाटचालीस व्हावा, या हेतूने शिक्षण विभागातील विविध उच्चपदस्थ रिक्त जागांवर पीएच.डी. धारक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. तसा धोरणात्मक व प्रशासकीय बदल सेवाशर्तीमध्ये करण्यात यावा. पीएच.डी. धारक शिक्षकांना शिक्षण विभागांतर्गत येणारी वर्ग 1, वर्ग 2 ची पदे, डायट प्राचार्य, डायट अधिव्याख्याता, शासकीय अध्यापक विद्यालयातील प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, एससीईआरटी, बालभारती, राज्य व विभागीय मंडळातील उच्चपदस्थ पदे, शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
विधानसभेत तारांकित प्रश्न – शालेय शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या पदांवर पीएच.डी. धारक शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, यासंदर्भातील तारांकित प्रश्न आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मांडला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी उल्हास कावरे यांनी विभागीय आयुक्तांकडून माहिती मागवली आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी पीएच.डी. धारक शिक्षकांची नावे मागवण्यात आली होती. परंतु त्यावर काय कार्यवाही झाली हे अद्यापपर्यंत समजलेले नाही.


