शिक्षकांच्या मूल्यमापन योजनेस शिक्षक परीषदेचा विरोध ; चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन नको : गिरीश नेमाडे


भुसावळ ( प्रतिनिधी )-
शिक्षकांच्या कामांच्या मूल्यमापनावर आधारीत वेतन देण्या संदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेसह विविध शिक्षक संघटनांनी विरोध केल्यानंतर रद्द करण्यात आला होता मात्र आता पुन्हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारीत वेतन देण्यासंदर्भात शासन स्तरावर विचार सुरू असल्याने अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून शिक्षकांचे वेतन निश्चित करण्याला महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचा विरोध असल्याचे माध्यमिक शिक्षक परीषदेचे भुसावळ तालुकाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश एस नेमाडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना गिरीश नेमाडे यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांची आकलन शक्ती एक समान नसते. शिक्षक शिकविताना सर्वच विद्यार्थ्यांसाठी पूर्ण क्षमतेने अध्यापन करीत असतो मात्र सर्व विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी ही भिन्न असते. शिक्षकांसाठी विद्यार्थी हे एकसमान असतात. परंतु सर्व विद्यार्थ्यांना एक सारखेच समजते असे नाही. ग्रामीण आणि शहरी भागात यात नक्कीच शैक्षणिक तफावत आढळून येत असते. इंग्रजी माध्यम, सेमी माध्यम, मराठी माध्यम, ग्रामीण व शहरी भाग, आदिवासी क्षेत्र यात विद्यार्थ्यांमधील क्षमतेत काही ना काही प्रमाणात तफावत ही दिसून येत असते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड, सचिव वंदना कृष्णा, आयुक्त विशाल सोळंकी यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार शिक्षकांचे मूल्यमापन करण्याची असंवैधानिक योजना राबविण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण प्रणालीची तीस कोटी रुपयांची निविदा शासनाने काढली आहे. त्या निविदे प्रकरणी पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे.
आमदार नागो गाणार यांनी असे म्हटले आहे की, शिक्षण क्षेत्रातील कर्मचार्‍यांना सेवेत शाश्वती व स्थैर्य मिळवून देण्यासाठी विधी मंडळाने कायदे केलेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे. शिक्षकांचे मूल्यमापन योजनेस शिक्षक परीषदेचा विरोध आहे. शासनाच्या विचाराधीन असलेला निर्णय योग्य व मानसशास्त्राला धरून नसल्याने शासनाने विद्यार्थी चाचण्यांवरून शिक्षकांचे मूल्यमापन करणे अयोग्य आहे. त्यामुळे या निर्णयाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक परिषदेचा विरोध असून विद्यार्थी गुणवत्तेचे निमित्त करून शिक्षकांच्या वेतन कपातीचा घातलेला घाट हाणून पाडला जाईल, असे भुसावळ तालुका माध्यमिक शिक्षक परीषद अध्यक्ष व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश एस.नेमाडे यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *