भुसावळ (प्रतिनिधी )-
१६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जळगाव रोड परिसरात आरोग्य व हिवताप विभागा मार्फत कोरोना विषाणू सोबत ताप रूग्ण व कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, आरोग्य कर्मचारी सुनील महाजन, आकाश सपकाळे, ज्ञानदेव चोपडे, आरोग्य सेविका लता वानखेडे यांनी नागरिकांना माहिती पत्रके वाटप करून घरातील व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्याचे सर्वेक्षण केले.

आठवडयातून किमान एकदा कोरडा दिवस पाळा:
पाणी साठवलेल्या भांडयाना योग्य पध्दतीने व्यवस्थित झाकून ठेवावे. घरा भोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी. घराच्या भोवती, वरती वापरात नसणारे टाकाऊ साहीत्य ठेऊ नये. घराच्या दारे खिडक्यांना बारीक जाळी बसवावी. कुलरचे पाणी दर दोन दिवसांनी बदलून घ्यावे. आठवडयातून किमान एकदा कोरडा दिवस पाळावा. डास अळी असलेली कंटेनर रिकामी करून घासुन पुसुन स्वच्छ व कोरडी करून नंतर पाण्याने भरावे अश्या आरोग्य कर्मचारी सुनील महाजन यांनी सूचना दिल्या.
नियम पाळल्यास संकट कमी: प्रा.पाटील
सध्या करोनाची दुसरी लाट राज्यात वेगात पसरते आहे. शहरी भागात रुग्ण मोठया संख्येने आढळत आहेत. हे संकट मोठे आहे तथापी आपण काही साध्यासुध्या गोष्टी नीट पाळल्या आणि नियम व्यवस्थित पाळले तर आपण यासोबत इतर संकटाची तीव्रता कमी करु शकतो. कोरोनासोबत अन्य आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतर आजार झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे असे प्रा.धिरज पाटील यांनी नागरिकांना सांगितले.
डेंग्यू, मलेरिया ताप घातक आजार असून रुग्णाची काळजी व वेळीच उपचार न घेतल्यास मृत्यू होऊ शकतो म्हणून नागरीकांनी काळजी घ्यावी असे अहवान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता दवंगे, वैद्यकिय अधिकारी न पा दवाखाना भुसावळ डॉ. किर्ती फलटनकर यांनी केले आहे.


