भुसावळ (प्रतिनिधी )-
काही दिवसांपासून ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ प्रशासनाने भुसावळ कंडारी रस्ता बंद केला आहे. यामुळे ऑर्डनन्स फॅक्टरी, रेल्वे कर्मचारी, तसेच कंडारी परिसरातील महिला, जेष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना भुसावळ, जळगावला दाखल करण्यासाठी जात असताना मोठा त्रास होतोय. तसेच फॅक्टरी, दिपनगर, रेल्वे आणि वरणगाव परिसरात काम करणारे ऑफिसर, मजूर यांना फेऱ्याने कामाला जावे लागत आहे. आज शिक्षकसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, युवासेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे आणि परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी भेट दिली. रस्ता पत्रे, इलेक्ट्रिक खांब, लोखंडी रॉड लावून बंद करण्यात आला आहे.

१९४८ साली ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे निर्माण कंडारी शिवारातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेले आहे. जमिनी हक्क कायद्यानुसार वहिवाट किंवा रस्ता देणे गरजेचे असते व त्यावरून सामान्य नागरिकाला प्रवास करता येतो. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी फॅक्टरी निर्माणसाठी गेलेल्या आहेत त्यांना छोटासा रस्ता रहदारीसाठी सोडणे अपेक्षित आहे हा रस्ता बंद करून परिसरातील नागरिक, शेतकरी व त्यांच्या परिवारावर अन्याय केला जात आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळाचे जनरल मॅनेजर यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच भेट घेणार असल्याचे प्राचार्य विनोद गायकवाड यांनी कळविले आहे.


