भुसावळ (प्रतिनिधी )-

मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रहिमपुरा येथील 35 वर्षीय महिलेवर भुसावळात सोमवारी रात्री 25 ते 30 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शहर व बाजारपेठ तसेच जळगाव गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याच्या तपासाला वेग देण्यात आला आहे. संशयीताच्या अटकेसाठी तीन पथक तयार करण्यात आले असून या प्रकरणी पाच संशयीतांची बारकाईने चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
भुसावळातील एका महिलेशी नाजूक विषयावर झालेल्या वादानंतर उभयंतांनी पोलिस ठाणे गाठले मात्र पोलिस ठाण्याबाहेर पडताच 35 वर्षीय महिलेला अज्ञात आरोपीने लाल रंगाच्या दुचाकीवरून ट्रामा केअर सेंटरमागील निर्जनस्थळी नेत दोन वेळा अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री 9.30 ते 11 दरम्यान घडली होती. अत्याचारानंतर आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र महिलेने वार चुकवल्याने तिचे प्राण वाचले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीने महिलेला ज्या मार्गावरून निर्जनस्थळी नेले त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्या आधारे पोलिसांच्या तीन पथकांतर्फे आरोपीचा शोध घेतला जात आहे शिवाय पाच संशयीतांची पोलिसांकडून बारकाईने चौकशी केली जात आहे. तपास पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.अधीक्षक अर्चित चांडक करीत आहेत.


