भुसावळ( प्रतिनिधी )-
शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून सरकारची कामगिरी व शिवसेना पक्ष सर्वसामान्य जनतेच्या घराघरात आणि मनामनात पोहोचवा. घर तिथे शिवसैनिक आणि गाव तिथे शाखा ही मोहीम यशस्वी करून पक्षसंघटन मजबूत करा असे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मा. विलासजी पारकर यांनी केले. जळगाव येथील शासकीय पद्मालय विश्रामगृहात संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तालुकानिहाय बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आमदार तथा जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, महिला आघाडीच्या रावेर लोकसभा मतदार संघाच्या संपर्कप्रमुख उषाताई मराठे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक कार्य. उपजिल्हा प्रमुख प्रा. उत्तम सुरवाडे यांनी केले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना मुंबई येथे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीतील प्रमुख मुद्द्यांचा परामर्श घेऊन शिवसंपर्क अभियान अधिक परिणामकारक कशा पद्धतीने राबवावे यासंबंधी मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की रावेर लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सर्व विधानसभा निहाय मतदार संघात येत्या 24 ते 27 तारखेदरम्यान शिवसंपर्क अभियान राबवायचे आहे. त्यात प्रामुख्याने शाखा फलकांचे नूतनीकरण, त्याची रंगरंगोटी, नवीन शाखांचे उद्घाटन, रक्तदान शिबिर राबवावे. महाराष्ट्र सरकारची कामगिरी, पक्षप्रमुखांनी घेतलेले कल्याणकारी निर्णय, सुरू केलेल्या नवनवीन योजना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हे सर्वसामान्य जनतेपर्यंत शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पोहोचवायचे आहे. त्यासाठी अगदी तालुकाप्रमुख, उपतालुका प्रमुख, जिल्हा परिषद- पंचयात समितीच्या विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, गटप्रमुख, उपगटप्रमुख, गणप्रमुख, उपगणप्रमुख व शाखाप्रमुख, बूथप्रमुख या सगळ्यांच्या समन्वयातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करायचे आहे माननीय उद्धवजी ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून आमदर सुहास कांदे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अभियानाचा संपूर्ण आढावा घेऊन पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचेकडे ते अहवाल सादर करणार आहेत. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हे अभियान यशस्वी करावे अशा सूचना त्यांनी या प्रसंगी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
संपर्क प्रमुख विलास पारकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक विधानसभेत असलेल्या एकूण मतदार संख्येच्या 30 टक्के नोंदणी शिवसेना सभासदांची झाली पाहिजे. प्रत्येक गावागावात जाऊन बुथनिहाय नियोजन करून जास्तीत जास्त शिवसेना सभासद नोंदणी या अभियानात करावयाची आहे. त्याचबरोबर जनतेशी सुसंवाद साधून जनतेच्या समस्या तालुक्यातीलव शहरातील रखडलेले विविध विकास काम, प्रलंबित प्रकल्प, लोकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा जाणून घ्या आणि त्या आमच्यापर्यंत पोहोचवा या सगळ्या भावना अहवालाच्या माध्यमातून पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यापर्यंत थेट पोहचवल्या जाणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून जोमाने कामाला लागा असे आदेश संपर्कप्रमुख यांनी याप्रसंगी दिले. रावेर लोकसभा मतदार संघातील उपजिल्हा प्रमुख, तालुकाप्रमुख,तालुका संघटक, विधानसभा क्षेत्रप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहरप्रमुख याचप्रमाणे महिला आघाडीच्या महत्त्वाच्या पदाधिकारी महिला जिल्हा संघटिका, महिला उपजिल्हा संघटिका, महिला तालुका संघटिका, महिला शहर संघटिका या बैठकीला उपस्थित होत्या. हजर असलेल्या पदाधिकाऱ्यांची याप्रसंगी लेखी नोंद घेण्यात आली यापुढे पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता अजिबात खपवून घेतले जाणार नाही अशा स्पष्ट सूचना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी दिल्या. या बैठकींना रावेर लोकसभा मतदार संघातून मोठ्या प्रमाणात सर्व मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.



