भुसावळात कोरोनाचा वाढला फैलाव : मास्क न लावणार्‍यांवर धडक कारवाई ; धक्कादायक – जळगाव जिल्ह्यात 169 रुग्ण आढळले ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या पाहता प्रशासनाकडे विविध उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. भुसावळातदेखील दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने गुरुवारपासून मास्क न लावणार्‍या नागरीकांसह वाहनधारकांवर 200 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली जात आहे. गुरुवारी शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने तब्बल 23 जणांवर कारवाई करून दंड वसुल करण्यात आला.
शहर पोलिसांकडून त्यांच्या हद्दीत पोलिस गाडीवरील स्पिकरवरून सूचना देण्यात येत आहे की, कोरोनाच्या पा्र्श्वभुमीवर प्रत्येकाने तोंडाला मास्क लावा अन्यथा पोलिसांकडून कारवाई सुरू केली आहे. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय पाटील,सोपान पाटील आणि अन्य पोलिस कर्मचार्‍यांनी 23 जणांविरूध्द मास्क नसल्याने प्रत्येकी 200 रूपये नुसार दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई दररोज केली जाणार असल्याचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वातही वाहतूक शाखा व नगरपालिका कर्मचार्‍यांनी संयुक्तरीत्या दंडात्मक कारवाई करण्यात आली.
प्रशासनाच्या माहितीनुसार शहर व तालुक्यात आतापर्यंत 193 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर चार हजार 601 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील चार हजार 367 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 41 रुग्णांवर उपचार सुरू असून गुरुवारी एकाच दिवसात 12 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *