नैतिकतेच्या आधारावर संजय राठोडांचा पक्षाकडे राजीनामा ; ना. गुलाबराव पाटील


जळगाव –
राज्यात सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं असून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच संजय राठोड यांनी आपला पदाचा राजीनामा मातोश्रीवर पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, राठोडांच्या राजीनाम्यावर शिवसेना नेते आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं आहे. वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात घेतले जात असल्याने त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा पक्षाकडे दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. येणाऱ्या काळात या प्रकरणाच्या चौकशीत ‘दूध का दूध, पाणी का पाणी होईल’, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे. ते जळगावात पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं चौकशी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सुरू झाली आहे. चौकशीत काय निष्पन्न होते? त्यानंतर मुख्यमंत्री निर्णय घेतीलच. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात काय निष्पन्न होते, ते पाहणे महत्त्वाचे असेल. तपासाआधीच आपण कोणाला शिक्षा करू शकत नाही. तपासात जर काही निष्पन्न झाले तर मीच नव्हे तर कुणालाही बोलण्याची गरज राहणार नाही. आपोआप गुन्हा दाखल होईल, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *