भडगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ ; कुत्र्याचा पाडला फडशा ;
भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरातील एरोंडोल रस्त्यावरील टीसिडी फॉर्म जवळ मेहताब नाईक यांच्या शेतातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना दि.8 रोजी सकाळी सात वाजे सुमारास घडली आहे. या बाबत परिसरातील शेतकरी वर्गात व जवळच पेठ भागातील रहिवासी मध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण पसरले असून या बिबट्याला लवकर जेरबंद करण्याची करावे यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी तहसिलदार सागर ढवळे यांना निवेदन दिले.
या बाबत अधिक असे की,शहरातील एरोंडोल रस्त्यावरील टीसिडी फार्म जवळ मेहताब नाईक यांचे शेत आहे या शेतात निंबु बागेत पाळीव कुत्रा होता. त्याच्यावर आज सकाळी सात वाजे दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्याचा फाडशा पडला. ही घटना मेहताब नाईक यांचा मुलगा प्रकाश नाईक हे शेतात गेल्यावर निदर्शनात आली. या वेळी त्यांनी वनविभागाला वारंवार संपर्क केला परंतु कुठलाही प्रतिसाद दिला नाही. या बाबत परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना निवेदन दिले.
या निवेदनात नमूद केले आहे की, भडगाव शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्याने जनावरांना मारणे सुरू केले आहे. त्याने दोन गाई व पंधरा कुत्र्यांचा फडशा पडला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. कुठलेही मजूर कामाला येत नाहीत. यामुळे शेतकऱ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तरी आपण या बिबट्या ला वनविभागाकडून जेरबंद करावे. अन्यथा कुठलीही जीवित हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदारी वनविभागाची असेल असे निवेदन तहसिलदार सागर ढवळे यांना शेतकऱ्यांनी दिले. या वेळी प्रकाश राठोड, सोमनाथ पाटील, भागवत पाटील, धर्मराज महाजन, टी. एस. पाटील, अनिल महाजन, रवींद्र शिरसाठ, युनूस पिंजारी, नाना उशीर, कांतीलाल पाटील, उमेश चौधरी आदी शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्याचा जीव गेला तेव्हा वनविभाग बिबट्याला पकडेल का? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
दहा दिवसात या बिबट्याने अनेक पाळीव प्राणी मारले, आज पुन्हा नाईक यांच्या शेतात कुत्र्याला मारले. वनविभागाचे सौ. पाटील यांना शेतकऱ्यांनी वारंवार फोन करून सुद्धा काही प्रतिसाद देत नाही. यावर शेतकऱ्यांनी आमचा जीव गेल्यानंतर वनविभाग बिबट्याला पकडणार का? असा सवाल यावेळी उपस्थित केला. तसेच या ठिकाणावरून भडगाव शहरातील पेठ भाग हा जवळ असल्यामुळे या भागातील रहिवासी व शेतकरी यांच्या मनात दहशत निर्माण झाली असून लवकरच बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे



