पाठ वाचन व कविता गायनाने बालभारतीचा गौरव

जळगाव – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारती या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठ वाचन करून व कविता गायन करून बालभारतीचा गौरव केला.
गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळांची सुरुवात 27 जानेवारी रोजी झाली. याच दिवशी बालभारतीचा वर्धापन दिन असल्याने जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेत बालभारती पाठ्यपुस्तकातील पाठांचे वाचन व कविता गायनाचा उपक्रम घेण्यात आला. यावेळी बालभारतीचे मराठी भाषा अभ्यास गट सदस्य डॉ. जगदीश पाटील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि शिक्षणमंत्री बाळासाहेब मधुकरराव चौधरी असताना 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झाली. गेल्या 54 वर्षांपासून बालभारती संस्थेमार्फत सातत्याने पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन सुरू आहे. प्रत्येकाच्या जीवनात वाचण्यासाठी येणारे पहिले पुस्तक म्हणून बालभारतीचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे आयुष्यभर निखळ आनंद देणारी बालभारती कायम लक्षात राहते. एक विद्यार्थी आणि आता एक शिक्षक म्हणून बालभारतीचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. आठवी, दहावी व बारावी पाठ्यपुस्तक निर्मितीत अभ्यास गट सदस्य म्हणून प्रत्यक्ष काम करण्याची संधी देखील मिळाली असल्याने बालभारतीची ही आठवण आयुष्यभर कायम लक्षात राहील, असे देखील डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, सुनंदा रोझतकर, साधना सुर्यराव, ज्योती वाघ आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मास्क देण्यात आले. मुख्याध्यापक संतोष वानखेडे यांनी कोरोनापासून बचावच्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *