भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात विरोधकांच्या काळात संपूर्णपणे अंधार होता मात्र भाजपाची सत्ता आल्यानंतर दिवा-बत्तीची सोय करण्यात आल्याने नागरीकांना किमान दिलासा मिळाला मात्र ज्यांनी कामे केली नाहीत ते आमच्यावर आता टिका करीत आहेत. माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांचे नाव न घेता ते म्हणाले की, ज्यांनी त्यांच्या सत्ताकाळात एकही खड्डा बुजवला नाही ते आता खड्ड्यात बसून आंदोलनाच्या गोष्टी करीत असल्याचे ते म्हणाले. विशेष रस्ता अनुदान योजनेंतर्गत दोन कोटी 98 लाख 58 हजार 812 रुपये खर्चाच्या कामांचा शुभारंभ जुना सातारा भागात सोमवारी झाला. याप्रसंगी आमदार बोलत होते.
आमदार म्हणाले की, अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांच्या कामांना विलंब झाला वेळेत आश्वासने पूर्ण न झाल्याने माफी मागतो व योजनेचा ठेकेदार बदलला असता तर पुन्हा नवीन कंत्राट, निविदा प्रक्रिया आदी बाबींसाठी वेळ जावू खर्च वाढला असता मात्र आहे त्याच ठेकेदाराला कायम ठेवत त्यांच्याकडून कामे केली जात असल्याचे ते म्हणाले. आता शहरातील सर्वच भागात रस्त्यांची कामे केली जातील शिवाय सत्ताधारी-विरोधक असा भेदभाव न करता विरोधकांच्या प्रभागातही कामे केली जातील, असे आमदार संजय सावकारे म्हणाले. शहरात स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी देखील आमदार-खासदारांकडे नागरीक करतात मात्र आता स्वच्छतेलाही प्राधान्य देण्याबाबत नगराध्यक्षांशी चर्चा केली असून त्यांनीदेखील स्वच्छतेबाबत पहिल्या दहा शहरांमध्ये क्रमांक आणू, अशी ग्वाही दिली आहे. निवडणुकीत पाणी, स्वच्छता व आरोग्याला प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली होती मात्र काही आश्वासने वेळेत पूर्ण न करू शकल्याने शहरवासीयांची आपण माफी मागतो, असेही ते म्हणाले.
व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, शफी पहेलवान, नगरसेवक मुकेश पाटील, गिरीश महाजन, भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे मुख्याधिकारी संदीप चिद्रेवार आदी उपस्थित होते.



