भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील जागर प्रतिष्ठानकडून नुकताच दहा गरजू कुटुंबांना एक महिन्याचा किराणा देण्यात आला. लॉक डाऊन व अनलॉकमध्ये देखील अनेकांच्या पोटाचा प्रश्न अजूनही धगधगत आहे. याची जाणीव ठेवत लॉक डाऊन कारणाने बेरोजगार झालेल्या निराधार व बेरोजगार कुटुंबांना प्राधान्य देत एक महिन्याचा किराणा देण्यात आला.
भुसावळ शहरातील ही समस्या व उपासमारीची दाहकता जागर मित्रांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांपर्यंत पोहचविली. त्यावर त्वरीत जागर व्हॉट्सअॅप ग्रुपवर आवाहन करताच मदत उभी राहिली आणि गरजू कुटुंबांच्या पोटाचा प्रश्न सोडविता आला. प्रसंगी जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रावेर येथील सौ. के.एस.ए.गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.पंकज पाटील, जागर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व श्री मल्टी सर्व्हिसेसचे संचालक श्रीराम सपकाळे, जागर प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष राजपथ क्लासेसचे संचालक हृषिकेश पवार व जागर मित्र रमेश कोळी उपस्थित होते.
लॉक डाऊनचा परीणाम सर्वच क्षेत्राला बसला आहे. परीणामी बेरोजगारी वाढली असून घरात राहिले तर उपासमार व बाहेर पडल्यावर कोरोना अशी स्थिती आहे मात्र या कठीण प्रसंगात ही टीम जागर आपल्या परीने मदतीस तत्पर असल्याचे जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील म्हणाले.



