भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील साकेगाव कॅबीनजवळ रेल्वे रूळ ओलांडताना दाम्पत्यासह दिड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये रेल्वेतील कर्मचारी हरीष शिरीष चौधरी (३६ ) त्यांच्या पत्नी जयश्री हरीष चौधरी (२७) व या दाम्पत्याची कन्या गुंजन हरीष चौधरी (दीड वर्ष) यांचा समावेश आहे. दरम्यान, या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचीही चर्चा आहे मात्र पोलिसांकडून नेमक्या कारणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेतील कर्मचारी हरीष यांचे साकेगावातील वाघोदे गल्लीत घर असून ते सध्या मात्र भुसावळातील मोहित नगरात वास्तव्यास आहेत. हे दाम्पत्य साकेगावातील घरी आले असल्याने बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडत असताना त्यांना रेल्वेचा धक्का लागल्याचे सांगण्यात आले. रेल्वेच्या धडकेत जयश्री व त्यांची कन्या गुंजनचा जागीच मृत्यू झाला तर हरीष यांना अत्यवस्थ अवस्थेत गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घटनास्थळी भुसावळ तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार व लोहमार्ग पोलिसांनी धाव घेतली.



