मुंबई :
पुरातन गुरु आणि महान संतांनी सत्याधिष्ठित उच्चतम मानवी मूल्यांनी
युक्त श्रेष्ठ जीवन जगण्याची कला स्वतः आचरणात आणून मानवाला शिकविली आहे. त्यांची शिकवण धारण करून आपण श्रेष्ठ जीवन जगावे संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी निरंकारी भक्तांसह समस्त
मानव-मात्राला आवाहन करताना उपरोक्त उदगार व्यक्त केले. १५ ऑगस्ट, २०२० रोजी मुक्ती
पर्व दिवसाच्या निमित्ताने आयोजित ऑनलाइन संत समागमामध्ये त्या बोलत होत्या. या ऑनलाइन संत
समागमामध्ये देश-विदेशातील अनेक निरंकारी भक्तगणांनी भाग घेतला त्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील काही
प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
संत निरंकारी मिशन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना बरोबरच मुक्ति पर्व दिवस आयोजित
करते ज्यामध्ये मिशनचे अगोदरचे गुरु तसेच महान संतांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली जाते. त्यामध्ये
शहनशाह बाबा अवतार सिंहजी, जगत माता बुद्धवन्तीजी, निरंकारी राजमाता कुलवंत कौरजी, पुज्य माता सविंदर हरदेवजी तसेच अशा अनेक भक्तांचा समावेश आहे ज्यांनी मिशनचा सत्य, प्रेम व एकत्वाचा संदेश जना-जनापर्यंत पोचविण्यासाठी आपले जीवन वेचले. सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी सांगितले, की जर मुलांचे जीवन उच्च मानवी मूल्यांनी युक्त व्हावे आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर कुटुंबातील जे ज्येष्ठ सदस्य आहेत त्यांचे आचरण आदर्श असायला पाहिजे. कारण मुले नेहमीच मोठ्यांचे अनुकरण करत असतात. मोठ्यांना त्यांचे जीवन श्रेष्ठ बनविण्यासाठी सदोदित सत्याच्या मार्गावर चालत राहणे गरजेचे आहे. मुक्तिच्या संदर्भात सद्गुरु माताजींनी प्रतिपादन केले, की जेव्हा आत्मा आपल्या निजस्वरुपाला जाणून एकरूप होतो तेव्हा त्याला मुक्तीचा अनुभव येतो. त्याच्या जन्ममृत्यूची श्रृंखला तुटून जाते. जीवन प्रवास चालूच राहतो पण भौतिक जीवनातील चढ-उतारांनी किंवा सुख-दुःखांनी तो वि चलीत होत नाही. असे जीवनमुक्त व सहज-सुंदर जीवन जगण्यासाठी ब्रह्म ज्ञानाच्या माध्यमातून आपले निजस्वरुप असलेल्या निराकार ईश्वराशी जाते जोडणे आवश्यक आहे. प्रभू -परमात्म्याशी नाते जोडून जो सदाचारी जीवन जगतो तो मुक्तिचा अधिकारी बनतो त्याचे जीवन सार्थक होते. या ऑनलाईन मुक्ती पर्व समागमामध्ये सहभागी झालेल्या देश-विदेशातील निरंकारी मिशनच्या
अनुयायांनी विचार, भक्तीरचना, भजन तसेच कवितांच्या माध्यमातून मिशनच्या पूर्वसूरिना आपली श्रद्धासुमने अर्पण करण्याबरोबरच त्यांच्या जीवनातून प्रेरणा प्राप्त केली.



