भुसावळ (प्रतिनिधी ) –
भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कृतीच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘जय भवानी, जय शिवराय, जय महाराष्ट्र’ असा उल्लेख असलेले तब्बल एक लाख पत्र त्यांना पाठवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी दिली आहे . नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य निवडीप्रसंगी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्यानंतर नायडे यांनी हे राज्यसभेचे सभागृह नव्हे, माझे दालन असून दालनात घोषणाबाजी करू नये, सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते, शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही, अशी समज नायडू यांनी भाजपा खासदाराला दिली होती. त्यामुळे भाजपाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय भावना आहेत? हे दिसून आले असल्याचे पाटील म्हणाले.
भाजपाच्या कृतीचा निषेध
‘जय भवानी, जय शिवाजी’ ही घोषणा देण्यापासून खुद्द छत्रपतींचे वंशज आणि श्रीमंत उदयनराजे भोसले महाराजांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा एक शिवप्रेमी म्हणून जाहीर निषेध करीत असल्याचे रवींद्र पाटील यांनी कळवले आहे. ते म्हणाले की,
दिल्लीच्या तख्ताकडून महाराष्ट्राचा अपमान करण्याचे अनेक प्रसंग इतिहासात घडले आहेत परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने याच दिल्लीचे तख्त महाराष्ट्राने आपल्या मुठीत ठेवले होते हादेखील इतिहास कोणी विसरू नये. छत्रपती आणि महाराष्ट्राचा अपमान करणार्या दिल्लीने लक्षात ठेवावे की, आमच्या रगा-रगात शिवछत्रपतींचे रक्त आहे आणि पुन्हा एकदा आम्ही दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकवू, असे त्यांनी कळवले आहे.
या सर्व घटनेचा निषेध म्हणून जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने व्यंकय्या नायडू यांना एक लाख पत्र पाठवून निषेध केला जाणार असल्याचेही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी सांगितले .
याप्रसंगी भुसावळ बाजार समितीचे सभापती सचिन संतोष चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील, शहराध्यक्ष रणजीत चावरीया, भुसावळ विद्यार्थी तालुकाध्यक्ष सागर दोडे, राहुल वाघ, योगेश नरोटे, डेविड पवार, संजय टाक, कपिल हजारे, विशाल सपकाळे, अरुण चौधरी, राजेश कुपेकर, संजय लाहोरीया, अमोल मांडे आदी उपस्थित होते.



