भुसावळ (प्रतिनिधी )-
वारंवार सूचना देऊनसुद्धा भुसावळ विभागात बसवलेल्या जीनस कंपनीच्या वीज मीटरमुळे ग्राहकांना अतिरिक्त वीज बिल पाठवले जात आहे. एक वर्षाचा कालावधी होऊनसुद्धा सरासरी देयके मिळाली, ६०० ग्राहकांना तर दुसऱ्याच ग्राहकांची देयके दिली गेली असून वर्षभरापासून या चुका घडत आहे. नागरिकांची संचारबंदीत आर्थिक परिस्थिती हाताबाहेर गेली असून जीनस कंपनीचे वीज मीटर गतीने फिरले आणि ग्राहकांना अवाजवी बिल आले. त्यात वारंवार होणारा खंडित वीज पुरवठा मनस्ताप वाढवणारा आहे. मान्सूनपूर्व कामे जून जुलैमध्ये करीत महावितरणने दर शनिवारी मेंटेनन्सच्या नावाखाली चार पाच तास वीज पुरवठा खंडित ठेवला आणि लाखो रुपये खर्च केले, परंतु रिमझिम पावसात दोन दोन तास बत्ती गुल होत आहे म्हणून दि. १६ जुलै रोजी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने व पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला. जळगाव विभागाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांना अनेक वेळेस तक्रार करूनसुद्धा त्यांनी मुद्दाम या विषयाकडे दुर्लक्ष केले आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. शिवसेना तालुका संघटक प्रा.धिरज पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, विभागप्रमुख अमोल पाटील, लोकेश वाणी यांनी दिनांक २३ ऑगस्ट पर्यंतची डेडलाईन यावेळेस दिली असून तक्रारीचा निपटारा न झाल्यास महावितरण कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्राहकांचा मनस्ताप वाढवणारी देयके:
जुना सातारा, खळवाडी परिसरातील भरत दिनकर पाटील यांना ऑगस्ट २०१९ पासून दुसऱ्याच ग्राहकाचे साधारण ५००० रुपये बिल देयकात वाढीव आले. एक वर्षापासून तीन चार वेळेस अर्ज सादर करून सुद्धा देयकात दुरुस्ती केली नाही. श्रीनगर भागातील टोपेश महाजन व प्रदीप हिरामण राणे यांना एक वर्षपासून दुसऱ्याच ग्राहकाचे वीज देयक दिले आहे कारण मीटर नंबर व ग्राहक क्रमांक यात अपडेट केलीच नाही व दर महिन्यात सरासरी देयक असल्याने मनस्ताप वाढला. काशीराम नगर भागातील लक्ष्मण पाटील यांच्या नावाने असलेल्या देयकात वापर न केलेल्या युनिटची ३५०० रुपये रक्कम वाढवुन दिली आहे. कॉन्ट्रॅक्ट संपला असतांनासुद्धा जीनस कंपनीच्या चुकीला महावितरण अधिकारी पाठीशी घालत आहे म्हणून अश्या प्रकारच्या चुकीच्या कामांना प्रोत्साहन मिळत आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
शिवसेनेने अनेक तक्रारी सोडवल्या:
महावितरणच्या चुकीमुळे नागरिक सरकारला जबाबदार ठरवतात, राज्य सरकार पारदर्शकपणे कार्य करीत असून यापुढे महावितरणच्या चुकीमुळे ठाकरे सरकारवर टीका झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल. मागील महिन्यात नागरिकांच्या वीज बिलाच्या अनेक तक्रारी शिवसेनेने सोडवल्या असून यापुढेही ग्राहकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन प्रा. धिरज पाटील यांनी केले आहे.



