शाळांकडून होतेय फी भरण्याची सक्ती ; भुसावळात शिवसेना युवासेना आक्रमक; गट शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ सह सध्या देशभरात अनलाॅक सुरू असताना देखील अनेक शाळा पालक आणि विद्यार्थ्यांकडे शिक्षण शुल्क (फी) मागू लागल्या आहेत. यासंदर्भातील असंख्य तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आल्यानंतर विभागाने सर्व मंडळांच्या इयत्ता १२ वी पर्यंतच्या शाळांसाठी सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये अनलाॅकच्या काळात कुठल्याही शाळेने विद्यार्थी/पालकांवर फी भरण्याची सक्ती करू नये, असं स्पष्टपणे बजावण्यात आलं आहे.
यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे की, कोरोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात देखील काही शैक्षणिक संस्था/शाळा, विद्यार्थी/पालकांना फी भरण्याची सक्ती करत असल्याच्या तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू वर्षाची आणि आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करू नये. लाॅकडाऊन संपल्यानंतर फी जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तरी सुद्धा भुसावळ शहरातील अनेक विद्यालयाने ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून फी वसुली सुरू केली आहे.
भुसावळात इयत्ता १२ वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना फी भरली नाही म्हणून व्हाट्स अँप्स ग्रुप मधून काढून टाकण्यात आले.पालकांनी शिवसेनेकडे तक्रार केली. भुसावळ शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक १४ जुलै रोजी भुसावळ येथील गट शिक्षणाधिकारी प्रधान यांना घडलेल्या प्रकारची माहिती दिली व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
फीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे. पुस्तके व शालेय साहित्य शाळेतूनच खरेदी करण्यासाठी सक्ती करणे चुकीचे आहे. अश्या शाळांच्या मान्यता रद्द केला पाहिजे म्हणून शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे असे बबलू बऱ्हाटे यांनी कळविले आहे.
यांची होती उपस्थिती …
शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, उपशहर संघटक नबी पटेल, युवासेना तालुकाप्रमुख हेमंत बऱ्हाटे, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, दिव्यांग सेना तालुका प्रमुख फिरोझ तडवी, मोहसीन तडवी, जावेद पटेल उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *