भुसावळात कडकडीत बंद : रस्त्यांवर शुकशुकाट; तगडा पोलीस बंदोबस्त ; सुमारे २०० वाहनचालकांवर कारवाई ;


भुसावळ
(प्रतिनिधी )- येथे मंगळवार सकाळपासून सात दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन सुरू झाला असून नागरिकांची याचे पालन करावे म्हणून अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे लॉकडाऊनचे सक्त पालन केले जात असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये जळगाव व अमळनेरसह भुसावळ येथे मंगळवार पासून सात दिवसांचा सक्तीचा लॉकडाऊन सुरू झालेला आहे. याचे पालन करण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही पोलीस स्थानकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच राखीव दलाच्या तुकडीच्या मदतीने शहरात ७ रोजी सकाळी सहा वाजेपासून बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शहरातील बहुतांश प्रमुख चौकांमध्ये आज सकाळपासूनच पोलीस उभे असून ते प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. यात कुणीही निरर्थक फिरत असल्याचे आढळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दुपारपर्यंत या प्रकारे सुमारे २०० च्यावर अधिक
वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.
२०० च्यावर दुचाकीस्वारांवर कारवाई
लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी मंगळवार रोजी संपूर्ण शहर कडकडीत बंद दिसून आले मात्र त्यानंतरही काही नागरीक दुचाकी व चारचाकी वाहने घेवून बाहेर पडल्याने त्यांच्यावर पोलिस प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दुपारपर्यंत सुमारे २०० हून अधिक दुचाकीस्वारांवर कारवाई झाली. तोंडाला मास्क न लावणे, डबल सीट दुचाकीवर प्रवास तसेच कागदपत्रे नसणे, तसेच विनाकारण बाहेर पडणार्‍यांवर कारवाई करण्यात आली
दरम्यान अपर पोलिस अधीक्षक भुसावळात तळ ठोकून
अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी मंगळवार रोजी शहराला भेट देवून विविध भागांची पाहणी केली तसेच पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवर कारवाईच्या सूचना देवून पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्याकडून परीस्थितीचा आढावा घेतला.
या संदर्भात माहिती देतांना बाजारपेठ पोलीस स्थानकाचे निरिक्षक दिलीप भागवत म्हणाले की, मंगळवार रोजी सकाळपासून अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त राखण्यात येत असून शहरवासियांचा सुद्धा लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. पुढील दिवसांमध्येही असाच प्रतिसाद देण्याचे आवाहन भागवत यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *