भुसावळ (प्रतिनिधी )-
शहर व तालुक्यात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात समस्या असून वरणगाव-हतनूर येथील राज्य राखीव पोलीस केंद्रास सरकारने अहमदनगरला हलविल्यावरून आजी-माजी आमदारांच्या गटांमध्ये आरोप प्रत्यारोप करून मनोरंजन व दिशाभूल करण्याचे काम केले जात असल्याचे रिपाइ आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष तथा मा.नगरसेवक राजु सूर्यवंशी यांनी त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.या पत्रपरिषदेत पक्षाचे पदाधिकारी रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव,पप्पु सूरडकर,शरद सोनवणे आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत राजु सूर्यवंशी पुढे म्हणाले की,आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आजी-माजी आमदार हे सर्व करीत आहे.अंतर्गत राजकारण बंद करून त्यांनी शहर व तालुक्यातील विविध प्रश्न,कोरोना संकट आदी विषयांवर बोलावे मात्र शहराचा वातावरण बिघडवू नये.
या प्रकरणात दोन्ही नेते आपले वर्चस्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे.राज्य राखीव पोलीस केंद्रामुळे प्रत्यक्षात रोजगार मिळणार नाही.२५ वर्षे होऊनही केंद्राचे काम झाले नाही किंवा कुणीही प्रयत्न केले नाही यामुळेच हे केंद्र येथून बाहेर गेले.या दोन नेत्यांनी या केंद्राबद्दल बोलण्यापेक्षा महामार्ग,औष्णिक विज निर्मिती केंद्रात किती तरूणांना रोजगार दिला. एमआयडीसीत किती उद्योग आणून रोजगार व प्रशिक्षण दिले ते जनतेला सांगावे.आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे सर्व विषय सुरू असून कार्यकर्त्यांचा वापर करून हे नेते लढाई लढत आहे.पत्रकार परिषदा घेऊन आजी-माजी आमदार सोशल डिस्टंन्सींगचा उल्लंघन करीत असून आता हे उद्योग दोघांनी थांबवावे अन्यथा त्यांच्या कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचेही शेवटी राजु सूर्यवंशी यांनी सांगितले.



