व्हर्चुअल रनमध्ये भुसावळ रनर्सचा यशस्वी सहभाग ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
आरोग्य उत्तम राहण्यासाठी चांगला पर्याय हा धावणे असला तरी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर धावपटू घरी असून त्यांना चालना देण्यासाठी व त्यांना धावण्यास प्रोत्साहीत करण्यासाठी ही वर्चुअल रन आयोजित करण्यात आली. तीन, पाच व दहा किलोमीटरच्या श्रेणीमध्ये ही रन आयोजित करण्यात आली होती. शिवाय घराच्या गच्चीवर, अंगणात अथवा मोकळ्या जागेत व आपल्या स्वतःच्या शहरातून स्पर्धक सहभागी होऊ शकत होते हे या रनचे वैशिष्ट्य होय. कुठलेही रनिंग अ‍ॅप वापरून आपली धाव संकेतस्थळावर नोंदवून स्पर्धकांना प्रमाणपत्रदेखील मिळाले .
दहा किलोमीटर अंतर केले पार
भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या संजय भटकर, गणसिंग पाटील, गोपाळ सोनवणे व प्रवीण पाटील या सदस्यांनी सरकारी नियमानुसार शारीरीक अंतराचे भान ठेवून दहा किलोमीटरचे अंतर धावून ही रन पूर्ण केले त्याचप्रमाणे दीपेश सोनार व मीना नेरकर यांनी देखील दहा किलोमीटर मध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. शिवाय सचिन मनवानी, कल्पेश मनवानी, प्रकाश अटवाणी व कैलास छाबरा या सर्व नातेवाईकांनादेखील शारीरीक अंतराला प्राधान्य देत दहा किलोमीटरमध्ये सहभाग नोंदविला. विजय पाटील यांनी पाच किलोमीटरचे अंतर आपल्या शेतात धावून पूर्ण केले. विशेष म्हणजे डॉ.नीलिमा नेहेते यांनी पाच किलोमीटर व अलका भटकर यांनी तीन किलोमीटरचे अंतर आपल्या घराच्या गच्चीवर धावून पूर्ण केले .
शरीर सुदृढतेसाठी नियमित व्यायामाचे आवाहन
या व्हर्चुअल रनमध्ये सहभागी सदस्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी धावून यशस्वी सहभाग नोंदविल्याबद्दल प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील व डॉ. चारुलता पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे थोडी शिथिलता असली तरी भुसावळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यामुळे परिस्थिती सामान्य होईपर्यंत सर्व धावपटूंनी बाहेर न पडता गच्चीवर अथवा घराच्या प्रांगणात धावण्याचा सराव करावा तसेच योगा व व्यायाम नियमित करावा आणि आपली फिटनेस कायम ठेवावी असे आवाहन भुसावळ रनर्सचे प्रमुख प्रवीण फालक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *