भुसावळात कोरोनाच्‍या काळात देखील होत आहे अत्यावश्यक रुग्णसेवा !

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्‍या दहशतीने भुसावळ येथील खाजगी रूग्‍णालये बंद असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्‍या. त्यावर पालकमंत्र्यांना दवाखाने सुरु करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या तसेच याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी देखील आदेश दिले होते.
या पार्श्वभूमीवर काही रुग्णांना मात्र रुग्णसेवेचा सुखद अनुभव देखील येत आहे. अशीच एक घटना दि. १३ मे रोजी भुसावळात निदर्शनात आली. जळगाव जामोद येथील एक २७ वर्षाची तरुण रुग्ण अपेंडिक्सच्या विकाराने त्रस्त होती.अनेक दिवस गोळ्या औषधी घेऊन देखील आराम पडत नव्हता आणि परिसरात ऑपरेशन होऊ शकत नव्हते त्यामुळे मजल दरमजल करीत भुसावळ येथे विश्वनाथ हॉस्पिटल मध्ये पोहोचली. तिथे डॉ. विनायक महाजन यांनी तिच्यावर अत्यावश्यक म्हणून शस्त्रक्रिया केली. परंतु दुपारी ४ वाजता रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांनी भूलतज्ञ डॉ. संज्योत पाटील आणि औषधवैद्यकशास्त्रतज्ञ डॉ. दीपक जावळे यांना मदतीला बोलाविले. रुग्णाचा जीव वाचणे महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन दोन्ही डॉक्टर लॉकडाऊन असताना देखील काही क्षणात विश्वनाथ हॉस्पिटलला हजर झाले आणि त्यांनी ३ तास प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि एका तरुण पेशंटचा प्राण वाचला.
तर दि. १४ मे रोजी डॉ.वीरेंद्र झांबरे यांच्या प्रतिभा हॉस्पिटल मध्ये पोटातील गोळ्या मुळे असह्य वेदना होत असलेल्या ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. याच दिवशी डॉ. प्रदीप फेगडे यांच्या मुक्‍ताई हॉस्पिटल मध्ये एका नवजात अर्भकावर एनआयसीयु मध्‍ये उपचार करण्यात आले. नव्याने सुरु झालेल्या रिदम हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागात दररोज किमान ३ ते ४ अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होत आहेत. डॉ प्रसन्ना जावळे यांचे पुष्पा हॉस्पिटल मध्ये देखील अत्यावश्यक शस्त्रक्रिया सुरु असल्याचे आढळून आले. डॉ. प्रवीण महाजन आणि इतर पॅथाॅलोजी लॅबोरेटरी आणि बहुतेक सर्व सोनोग्राफी सेंटर मध्ये रुग्णांची तपासणी होत आहे. शहरातील बहुतांशी स्त्रीरोगतज्ञांकडे प्रसुती आणि गरोदर रुग्‍णांवर अत्यावश्यक उपचार होत आहेत. तर अस्थिरोगतज्ञ अपघातातील रुग्णांवर नियमित उपचार करीत असल्याची माहिती देखील समोर आली. भुसावळ येथील नगरसेवक पिंटू कोठारी काही दिवसांपूर्वी एका रक्तबंबाळ मुलाला डॉ. किरण झांबरे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले असता त्यांना देखील याचा अनुभव आला.
जमेल त्याप्रकाराने दवाखाने सुरु ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र काही वेळा दवाखाने बंद राहतात यात प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ आणि अपुरी साधन सामुग्री अशी कारणे आहेत. बहुतेक सर्व दवाखान्यात कर्मचार्यांना रहिवासाची सुविधा नाही ते घरून येजा करणारे आहेत. भुसावळ मध्ये अनेक प्रतिबंधित क्षेत्रे आहेत यामुळे महत्वाचे मुख्य रस्ते बंद आहेत तर अनेक पर्यायी छोटे रस्ते स्थानिक रहिवाशांनी बांबू आणि पत्रे लाऊन कोरोनाचे दहशतीमुळे बंद केले आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा कर्मचारी कामावर येऊ शकत नाहीत तसेच हॉस्पिटल मध्ये दैनंदिन देखभालीच्या वस्तूंचा पुरवठा जसे ऑक्सिजन सिलेंडर, जनित्रासाठी लागणारे डीझेल, साफसफाईच्या वस्तू आदि लॉकडाऊन मुळे नियमित उपलब्ध होत नाहीत आणि पर्यायाने काही वेळा हॉस्पिटल बंद ठेवावे लागते हि बाब देखील समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *