भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील खडका येथील अंगणवाडी क्रमांक १७ मध्ये सोमवारी बालकांना देण्यात आलेल्या शालेय पोषण आहारात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली तर पालकांनी संताप व्यक्त केला.
याबाबत पालकांनी बालविकास प्रकल्प अधिकार्यांना दिलेल्या तक्रारीवरुन तत्काळ पंचनामा करण्यात आला. या अंगवाणीला पोषण आहार पुरवठा करणार्या बचत गटाविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. खडका येथील अंगणवाणी क्रमांक १७ मध्ये बालकांना सोमवारी वरण – भाताचा पोषण आहार देण्यात आला मात्र बालकांनी घरी डबे नेल्यानंतर वरण व भातामाध्ये अळ्या आढळल्या. सोमवारी बालकांना मिळणार्या पोषण आहारात आळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली.
पोषण आहारात अळ्या आढळल्यानंतर पालकांनी भुसावळ येथील बाल विकास अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपाची तक्रार केली. यामुळे कार्यालयातील अधिकारी व निरीक्षकांनी येवून पोषण आहाराची पाहणी केली. या पोषण आहारात अळ्या आढळून आल्याबाबत पंचनामा करण्यात आला आहे. पालकांनी अधिकार्यांसमोरच पोषण आहाराचा कंत्राट घेतलेल्या बचत गटाच्या कार्यपध्दतीवर ताशेरे वाढले. बालकांना नेहमीच नित्कृष्ठ दर्जाचा पोषण आहार दिला जातो, आता तर या पोषण आहारात अळ्या निघत आहेत यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या बचतगटाचा पोषण आहाराचा कंत्राट तातडीने बंद करावा, अशी मागणीही पालक हर्षल बावस्कर, राहुल पाटील, गणेश बरकले, विशाल बुगले, भिकन पाटील, किरण पाटील, विशाल गावंडे, पांडूरंग माळी, नथ्थू कोळी, ज्योत्सा पाटील, शोभा माळी, संगीता पेरले आदींनी केली. या प्रकाराची माहिती मिळताच उपसरपंच अनिल महाजन, पंचायत समितीच्या माजी सभापती प्रीती पाटील, माजी उपसभापती गोलू पाटील आदींनी भेट देवून पाहणी केली. पोषण आहारात अळ्या आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे.



