देशाच्या विकासात महिला अभियंत्यांच्या वाटा मोठा: प्रा.सुलभा शिंदे जागतिक महिला समता दिवसानिमित्त गाडगेबाबा अभियांत्रिकीत कार्यक्रम


भुसावळ (प्रतिनिधी )-
आज अभियांत्रिकी क्षेत्रांमध्ये विविध प्रकारची झुंज देत अनेक महिला, पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करून जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवत आहे. जिद्दीने आणि कष्टाने नवे विश्व निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत आहे. केवळ सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठीच नाही, तर देशातील गरिबी संपुष्टात आणण्यासाठी देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासामध्ये अभियंता महिलांचा सहभाग फार मोठा आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेत अनेक महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवला आहे असे मत वुमन्स डेव्हलपमेंट सेल प्रमुख प्रा.सुलभा शिंदे यांनी मांडले.
महिलांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे त्यांच्या प्रश्नांकडे समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रियपणे समाजासाठी योगदान देण्याची ऊर्जा निर्माण व्हावी, तसेच महिलांचा योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा या उद्देशाने जागतिक महिला समता दिन २६ ऑगस्ट रोजी दरवर्षी साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आज श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील महिला विकास केंद्राच्या मार्फत चर्चासत्र घेण्यात आले.
जर युवा पिढीच्या मनात स्त्री-पुरुष समानतेचे बीज रुजवायची असेल आणि मुलींना निर्भय होऊन उच्च शिक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर समाजाने दृष्टिकोन बदलणे अपरिहार्य आहे. गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये या विषयाची जाणीव निर्माण करण्यासाठी स्त्री-पुरुष समानतेविषयी समाजाला जागृत करण्यासाठी नेहमीच कार्यक्रम राबवले जातात अशी माहिती त्यांनी दिली.
प्रा.सुलभा शिंदे, डॉ.प्रीती सुब्रमण्यम, प्रा. वर्षा वाघ, प्रा.लीना अग्रवाल व विद्यार्थीनी सहभाग नोंदवला.

महिला अभियंत्यांना असंख्य संधी:
आजच्या सामाजिक वातावरणात स्त्रिया व मुलींना असंख्य संधी उपलब्ध होत आहेत, पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. ही परिस्थिती बदलून स्त्रिया व मुलींना आत्मविश्वासाने जगण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने भारत देश सुसंस्कृत व सुरक्षित मानला जात आहे. महाराष्ट्र हे ऐतिहासिक काळापासून महिलांना समानतेची वागणूक देणे व त्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी अग्रेसर आहे. शासनाने सुद्धा या बद्दल पावले उचलली असून मुली अपेक्षित संख्येने उच्च शिक्षणाचा लाभ घेत आहेत, त्यामुळे भावी महिला अभियंत्यांना असंख्य संधी निर्माण झाल्या आहेत असे प्रा.लीना अग्रवाल यांनी सांगितले.

आवाहन पेलण्यासाठी सज्ज:
उद्योजकता हे महिला कर्तृत्वचे नवे क्षेत्र बनले आहे. भारतात आजही काही यशस्वी उद्योजक महिला देशाच्या विकासात वाढ करण्याच्या दृष्टीने आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडत आहेत, आम्हीही आता आवाहने पेलण्यासाठी सज्ज आहोत, असे मत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाची विद्यार्थीनी पूर्वा भोळे हिने मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *