कालबाह्य यंत्रणेचे कारण दाखवून भुसावळ पालिकेचा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार दाखल;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळच्या नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. यंदाही तीच परंपरा पालिकेने कायम ठेवली असून शहरात होणाऱ्या गढूळ पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात नियमितपणे अशुद्ध पाणी पुरवठा करणाऱ्या पालिकेने आता कालबाह्य यंत्रणेचे कारण पुढे केले आहे.
यावल, रावेर, वरणगाव, सावदा व इतर क वर्ग नगरपालिकेत सुद्धा पाणी पुरवठा होत असून ‘अ’ वर्ग भुसावळ पालिकेतर्फे पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राची यंत्रणा कालबाह्य झाल्याचे कारण आज पाणी पुरवठा अभियंता नितीन लुंगे यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, गणेश पाटील, विशाल पवार, अर्थव जोशी यांनी केंद्रास भेट दिली तेव्हा सांगितले.
भुसावळ शहरातील सर्वच भागात दर महिन्यात दोन तीन वेळेस अनियमित व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे जादा पैसे खर्च करून पाण्याचा जार/बाटल्या विकत घ्याव्या लागत आहेत. कोट्यवधींचा अर्थसंकल्प असणाऱ्या भुसावळ पालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा सक्षम नसल्याचा जाब पालिकेला विचारला. पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर आजारांनी डोके वर काढले आहे. यासर्व बाबतीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. पाणी पुरवठा मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली असून नवीन केंद्रात साधन सामुग्री लवकर उपलब्ध करून द्यावी व भुसावळकरांची शुद्ध पाणी पिण्याची तहान भागवावी अशी मागणी केली आहे, असे शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे यांनी सांगितले.
तुरटी किंवा आलम वा इतर शुद्धीकरण पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असताना कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी फवारणीसाठी वापरला गेला व बिले काढण्यात आली आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *