शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात ‘कल्चरल हेरिटेज क्लब’ची स्थापना; ऐतिहासिक साहित्याच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना समृद्ध सांस्कृतिक वारशाची ओळख!

जळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, ऐतिहासिक वारसा, कला, परंपरा आणि ऐतिहासिक वास्तू यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याची भावना रुजावी, या उद्देशाने शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जळगाव येथे ‘कल्चरल हेरिटेज क्लब’ची स्थापना करण्यात आली. यानिमित्त आयोजित ऐतिहासिक व सांस्कृतिक साहित्याच्या विशेष प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाला कल्चरल हेरिटेज फाऊंडेशनचे सन्माननीय पदाधिकारी डॉ. भुजंग बोबडे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या समन्वयिका राजलक्ष्मी परांजपे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, उपमुख्याध्यापक संजय वानखडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक जगदीश साळुंखे आणि पर्यवेक्षिका रमा तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. योगेश सोन्जे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यामिनी चौधरी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे डॉ. भुजंग बोबडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून भारतीय संस्कृतीचे महत्त्व, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका याविषयी सविस्तर विवेचन केले. आपल्या पूर्वजांनी जपलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा हा आपल्या ओळखीचा महत्त्वाचा भाग असून, त्याचा अभिमान बाळगून तो पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक सचिन देशपांडे यांनी सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. ‘कल्चरल हेरिटेज क्लब’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक वास्तू, भारतीय परंपरा, लोककला, सण-उत्सव तसेच भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंची प्रत्यक्ष माहिती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऐतिहासिक साहित्याच्या प्रदर्शनाने वेधले लक्ष

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्राचीन आणि ऐतिहासिक साहित्याचे प्रदर्शन. या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वहस्ते लिहिलेले पत्र, विविध प्राचीन हस्तलिखिते, महाकवी कालिदास लिखित ‘रघुवंश’ काव्य, ‘गंगालहरी’, गणितज्ञ भास्कराचार्य यांनी लिहिलेले हस्तलिखित, प्राचीन नाण्यांचा संग्रह, पोस्ट तिकिटांचा संग्रह तसेच ऐतिहासिक माहिती देणाऱ्या दुर्मिळ साहित्याचा समावेश होता.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारतीय इतिहास, साहित्य, गणित, कला आणि सांस्कृतिक परंपरांचा अनमोल ठेवा जवळून पाहण्याची संधी मिळाली. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी प्रदर्शनाला भेट देऊन ऐतिहासिक साहित्याची माहिती जाणून घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुश्री मदाने यांनी केले, तर मनीषा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

‘आपला वारसा, आपली ओळख; संस्कृतीचे जतन हीच आपली जबाबदारी!’ या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, विद्यालयाचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.