काही समाजकंटकांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील किनगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनावर तसेच पोलिसांवर झालेली दगडफेकीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काही समाजकंटकांकडून पुन्हा एकदा दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. किनगाव येथील या घटनेतील दोषींना तातडीने तडीपार करण्याचे आदेश द्यावेत, अशी ठाम मागणी त्यांनी केली. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विजयादशमीनिमित्त अनेक वर्षांनंतर पोलिसांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, किनगाव येथे या पथसंचलनादरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. या प्रकरणात जळगाव पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ५७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, १७ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल सोमय्या यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. तसेच, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आणि समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या दोषींविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना सोमय्या यांनी आगामी काळात राज्यात समान नागरी कायदा लागू होणार असल्याचेही सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला आमदार अमोल जावळे, महापौर दीपमाला काळे, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा पदाधिकारी डॉ. केतकी पाटील, नगरसेवक अरविंद देशमुख यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


