भुसावळ ( प्रतिनिधी)- भुसावळ शहरातील बहारे मदीना मशिदीजवळ झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने छडा लावला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शेख कैफ शेख जाबीर (रा. बहारे मदीना मशीदजवळ, भुसावळ) हे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजेपासून १० ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत आपल्या घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने घरातून २० हजार रुपये रोख रक्कम, १२ हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल आणि ८ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई या गुन्ह्याचा तपास करून अज्ञात आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत या गुन्ह्यातील संशयितांबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तातडीने कारवाई करत मोहम्मद अझरुद्दीन शेख हमीद (वय १९, रा. न्यू ईदगाहमागे, भुसावळ) आणि शेख मोहम्मद आरिफ नुरुल हसन (वय २२, रा. अयान कॉलनी, भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, गुन्ह्यात चोरीस गेलेली २० हजार रुपयांची रोकड, १२ हजार रुपये किमतीचा रेडमी मोबाईल आणि ८ हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल, असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. डी.बी. पथकाचा सहभाग ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार, पोलीस कॉन्स्टेबल मोहसीन शेख, अशोक बाविस्कर, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, योगेश माळी, चंद्रकांत रायपुरकर, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर अढाडे, अक्षय कोतकर, जीवन कापडे आणि हर्षल महाजन यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार पोलीस हेडकॉन्स्टेबल कांतीलाल रघुनाथ केदारे करीत आहेत.


