तब्बल ३४४ बौद्ध मुला मुलींनी दिला परिचयबौद्ध वधु – वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न :

जळगाव (प्रतिनिधी)- ' ५ वा बौद्ध वधु - वर परिचय मेळावा  ' दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात  अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला . या मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध भागांतून तसेच गुजरात , मध्यप्रदेश , दिल्ली येथूनही काही जणांनी हजेरी लावली .
      या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे होते त्यांनी समाजात  ' सामूहिक विवाह ' ही संकल्पना रुजविणे ,  लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात होणारा सर्वच प्रकारचा खर्च अवास्तव स्वरूपाचा असल्याने त्याला रोकणे आपले कर्तव्य आहे असे विचार व्यक्त केले .
      प्रसिद्ध साहित्यिक जयसिंग वाघ यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की विवाह जुळवितांना फार मोठ्या प्रमाणात अपेक्षा बाळगणे , विविध अटी - शर्ती ठेवणे , मान - पान करिता रुसणे , पत्रिका जुळवत बसणे , चार - चार , पाच - पाच तास उशिराने लग्न लावणे , लग्नात पैशांची उधळपट्टी करणे आता बंद केले पाहिजे . विवाह केवळ ' सामाजिक करार ' असल्याने त्याला सामाजिक स्वरूप ठेवावे , विवाहाला पैशात तोलू नये असे विचार मांडले .
   महाराष्ट्रातील प्रसिद्ध गीतकार सागर पवार यांनी आपल्या गीतातून उपस्थितांची दाद मिळविली .
     प्रसिद्ध उद्योगपती भगवान उके यांनी तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्मिती करिता प्रयत्न करावे , नोकरी मध्ये जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पैसे आपणास आपल्या रोजगारात मिळतो असा उपदेश केला .
    समाजसेविका शिला उके , मुख्य संयोजिका चंदा सुरवाडे , ॲड. आनंद कोचुरे , रमेश तायडे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून या सामाजिक उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर कदम , प्रास्ताविक मुख्य संयोजक चंद्रगुप्त सुरवाडे , आभारप्रदर्शन अशोक तायडे यांनी केले . सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तर बौधाचार्य सुभाष सपकाळे यांनी त्रिसरण, पंचशील म्हटले .
  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हरिभाऊ सुरवाडे , मिलिंद साबळे , स्वाती नन्नवरे , शारदा सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमास जवळ जवळ १००० पेक्षा अधिक उपवर वधु - वर व पालक उपस्थित होते . अतिशय मंगलमय वातावरणात व उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला .