भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सुसरी येथे शेतात कांदा पिकाला पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सुसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेत अशोक बाबुराव पाटील आणि सरिता अशोक पाटील यांचा मृत्यू झाला. प्राथमिक अंदाजानुसार, शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या झटका मशीनमधून विजेचा धक्का लागल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतात कांदा पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या या दाम्पत्याच्या मृत्यूमुळे परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, पिकांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या झटका मशीनमध्ये वीजप्रवाह कसा आला, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. झटका मशीनमधून वीजप्रवाह येण्यामागील नेमके कारण काय, मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का किंवा अन्य काही कारणामुळे ही दुर्घटना घडली, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेतातील विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणेने घटनेची वस्तुस्थिती तपासून योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


