भुसावळ ( प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील वांजोळा रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरात दरोड्याच्या तयारीत जमलेल्या सहा जणांच्या टोळीचा भंडाफोड करण्यात भुसावळ शहर पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत टोळीतील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, तिघे संशयित अद्याप फरार आहेत. संशयितांकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि विविध घातक शस्त्रे जप्त करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे पावणे नऊ वाजेच्या सुमारास वांजोळा रोडवरील स्वामी विहार कमानीसमोरील रस्त्यावर काही संशयित दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्र आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान संशयितांकडून एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, धारदार चाकू, स्टीलची फोल्डिंग स्टिक, दोरखंड तसेच मिरची पूड असा दरोड्यासाठी वापर होऊ शकणारा साहित्यसाठा आढळून आला. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणात रोहनसिंग बावरा, आर्यन मोरे आणि विशाल ठाकरे यांच्यासह एकूण सहा जणांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली असून, उर्वरित तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. याप्रकरणी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील दरोड्याच्या तयारीसंबंधीच्या तरतुदी, शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून, या टोळीचा पूर्वीच्या गुन्ह्यांशी काही संबंध आहे का, तसेच दरोड्याचे नेमके लक्ष्य कोणते होते, याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


