भुसावळ कारागृहात विधी सेवा जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न ; कैद्यांना मोफत कायदेशीर सहाय्य, मूलभूत हक्क आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती ;

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा प्राधिकरण, भुसावळ यांच्या वतीने आयोजित विधी सेवा जनजागृती कार्यक्रम १३ ऑक्टोबर २०२६ रोजी भुसावळ कारागृह परिसरात संपन्न झाला. या कार्यक्रमात कारागृहातील कैद्यांना विधी सेवा समितीचे कार्य, मोफत कायदेशीर सहाय्य मिळविण्याची प्रक्रिया, कैद्यांचे कायदेशीर हक्क तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमासाठी अॅड. प्रयोद प्रल्हाद तायडे, पॅरा लीगल स्वयंसेवक (पीएलव्ही) रूपाली नेवे आणि अधिकार मित्र पीएलव्ही सौ. स्वाती भोळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अॅड. तायडे यांनी कैद्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्या तक्रारी समजून घेऊन त्यांचे निरसन करण्यासाठी मार्गदर्शन केले.

विविध कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन

या जनजागृती कार्यक्रमात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना तसेच विविध कारणांमुळे कायदेशीर मदतीपासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना उपलब्ध असलेल्या कायदेशीर सहाय्याची माहिती देण्यात आली. यासोबतच ‘संवाद’ योजनेच्या माध्यमातून कायदेशीर हक्क, शासकीय कल्याणकारी योजना आणि मोफत विधी सेवा याबाबत जनजागृती करण्यात आली.

पर्यायी विवाद निवारण पद्धतीचे महत्त्व व त्याचे फायदे, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आणि कैद्यांना उपलब्ध असलेले कायदेशीर अधिकार या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. विचाराधीन कैद्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक समुपदेशन उपलब्ध करून देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच कायदेशीर मदतीसाठी उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या हेल्पलाइन क्रमांकाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.

कायदेशीर मदतीचा लाभ घेण्याचे आवाहन

कारागृहातील कैद्यांनी तालुका विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या मोफत कायदेशीर सहाय्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विधी सेवा समितीची माहितीपत्रकेही वितरित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभारी अधीक्षक श्री. एल. पी. नागमोते, हवालदार श्री. संजय काशिराम पाटील, हवालदार श्री. जबीर शेख शब्बीर, तसेच कारागृह शिपाई श्री. अंबादास देवरे आणि श्री. सुनील श्रीराम पारधी यांनी विशेष सहकार्य केले.